देशात कोरोना महामारीचे संकट आल्याने, संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे अनेकांना आपल्या नोक-या गमवाव्या लागल्या. कोरोना आणि टाळेबंदीमुळे लाखो लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीतीने CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीच्या काळात 76 टक्के लोकांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत.
लाखो लोकांनी गमावल्या नोक-या
सर्वेक्षणात सुमारे 76 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या नोक-या गमावल्या, तर 24 टक्के लोकांनी इतर काही काम सुरु करण्यासाठी आपली नोकरी सोडली. तसेच, 63 टक्के लोकांना कोरोनाच्या काळात आपल्या गरजांसाठी पैसे उधार घ्यावे लागले. तर 15 टक्के लोकांना या महामारीच्या काळात आपल्या गावी परतावे लागले.
(हेही वाचा: भोंग्यांचा मुद्दा युपीपर्यंत पोहोचला; योगी सरकारने जारी केली भोंग्यांविषयी नियमावली )
असे आहे सर्वेक्षण
या सर्वेक्षणात सहभागी असणा-यांपैकी 60 टक्के लोक कुठेना कुठेतरी नोकरी करतात, असे आढळून आले. यापैकी 33 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या नोकरीत गुंतलेले होते आणि 27 टक्के छोटा व्यवसाय चालवत आहेत. 17 टक्के लोक सध्या नोकरीच्या शोधात आहेत. तर 19 टक्के महिला या गृहिणी आहेत. 4 टक्के शिक्षण पूर्ण करत आहेत. या सर्वेक्षणातून असे समोर आले की, 41 टक्के स्त्रिया या त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होत्या, त्यापैकी 22 टक्के नोकरदार होत्या.
Join Our WhatsApp Community