स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जसे भारतमातेच्या स्वातंत्र्य चळवळीमधील सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्रोत होते, तसे ते भारतातील समाजप्रबोधनाच्या कार्यामध्ये अग्रणी होते. त्यांच्या नावातील तेज ७० वर्षे काँग्रेसला सहन झाले नाही. वारंवार वीर सावरकर यांचे तेजस्वी कार्य झाकण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला, परंतु ते पुन्हा पुन्हा सूर्योद्याप्रमाणे लख्ख प्रकाशात समोर येत राहिले. म्हणून वीर सावरकर यांचे नाव देशाच्या राजधानीतील एका महाविद्यालयाला देण्याचा अंतिम निर्णय झाला आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचा निर्णय
दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत नवीन दोन महाविद्यालयांना नावे देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये एका महाविद्यालयाला वीर सावरकर यांचे नाव आणि दुसऱ्या महाविद्यालयाला दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंग ह्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. यासाठी अनेक नावांचे प्रस्ताव आले होते, मात्र शिक्षण संस्थांना साजेल अशी ही दोन नावे अंतिम करण्यात आली, असे कार्यकारी परिषदेच्या सदस्या सीमा दास म्हणाल्या.
दिल्ली विद्यापीठाने महाविद्यालयाला वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचे मी स्वागत करतो. ही आजची आवश्यकता आहे. कारण आज राजकीय स्वार्थापोटी वीर सावरकर यांचा विषय वादग्रस्त विषय बनवून ठेवला जातो. वीर सावरकर खरे कोण होते, हे जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. वीर सावरकर यांनी माफी मागितली का, यावरच चर्चा होते. ज्येष्ठ साहित्यिक विक्रम संपथ यांनी त्यांच्या पुस्तकातून सुस्पष्ट केले आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी वीर सावरकर यांनी लिहिलेल्या सर्व अर्जांचा उल्लेख केला आहे. त्यात वीर सावरकर यांनी कुठेही माफी मागितल्याचे स्पष्ट होत नाही. परंतु तरीही चर्चा याच विषयाची होते. १३ वर्षे वीर सावरकर यांनी रत्नागिरीत काय कार्य केले? त्याचा जर लोकांनी अभ्यास करून त्याचे अनुकरण केले, तर देशातील सर्वात मोठे प्रश्न सुटतील. कारण आज जातीयतेने उग्ररूप धारण केले आहे. सर्व राजकीय पक्ष हे तोंडात त्यांच्या समानतेची भाषा असते, पण जेव्हा निवडणूक जाहीर होते, त्यावेळी त्या त्या मतदारसंघातील जातीय समीकरणे काय आहेत, त्यावरच त्या त्या जातीचा उमेदवार ठरवला जातो. अशा परिस्थितीत वीर सावरकर यांचे जात निर्मूलनाचे विचार, विवेकी विचार अभ्यासले गेले पाहिजे. त्यांचे अनुकरण झाले पाहिजे. अशा वेळी शिक्षण क्षेत्रात नव्या महाविद्यालयाला वीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय होणे, म्हणूनच स्वागतार्ह आहे.
– रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.
अंतिम निर्णय कुलगुरूंचा
या नवीन दोन महाविद्यालयांना नावे देण्यासंबंधीची संकल्पना प्रथम ऑगस्ट महिन्यात शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय झाला आहे. यावेळी इतरही नावे सुचवण्यात आली होती, मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा कुलगुरूंचा असतो, त्यांनी वीर सावरकर आणि स्व. सुषमा स्वराज यांच्या नावांची निवड केली.