कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर रोहा चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आठ डब्यांची ही गाडी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ही गाडी बंद न करता ती कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ सेफ्टी फिचर; महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित )
कोकण रेल्वेने कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने गणेशोत्सवासाठी १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत मेमू स्पेशल गाडी सुरू केली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा चिपळूण अशा विस्तारित करण्यात आल्या आहेत. मात्र आम्ही दादर ते चिपळूण या गाडीची गेले अनेक वर्षे मागणी केली आहे. ती गाडी अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले होते. चिपळूण व परिसरातील जनतेसाठी मुंबईत ये-जा करण्यासाठी ही गाडी आवश्यक आहे. केवळ गणेशोत्सवासाठी सुरू केलेली दिवा ते चिपळूण ही मेमू गाडी कायमस्वरूपी चालवावी व या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.
मेमू गाड्यांचा सरासरी वेग प्रति तास ५० किलोमीटर आणि जास्तीत जास्त १०० किलोमीटपर्यंत असतो. ही गाडी डिझेल आणि विद्युत अशा दोन्हीवर धावणारी असते.
असे असणार तिकीट दर
- रोहा ते माणगाव- ४५ रुपये
- रोहा ते वीर- ५५ रुपये
- रोहा ते करंजाडी- ६५ रुपये
- रोहा ते विन्हेरे- ६५ रुपये
- रोहा ते खेड- ८० रुपये
- रोहा ते चिपळूण- ९० रुपये