राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचा प्रभाव देशभर पाहायला मिळत आहे. सध्या मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा याने राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी पुण्यात हनुमान जयंतीनिमीत्त महाआरतीही केली. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर आता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण सुरु झाले आहे. त्यामुळेच सध्या राज्यात हनुमान चालिसाच्या छोट्या पुस्तकांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी हनुमान चालिसा पुस्तकाला अधिक मागणी
हनुमान चालिसाच्या छोट्या पुस्तकांना अचानक आलेल्या या मागणीमुळे धार्मिक पुस्तकांच्या दुकानांतही पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दादरच्या गजानन बूक डेपोमध्ये याबाबत माहिती घेतली असता, तेथे हनुमान चालिसाच्या छोट्या पुस्तकांची यावर्षी विक्रमी विक्री झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सध्या हनुमान चालिसाच्या पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले.
वाढत्या मागणीमुळे तुटवडा
मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा हनुमान चालिसाच्या पुस्तकांना अधिक मागणी आहे. तसेच, यावर्षी दादरच्या हनुमान मंदिरासमोर मी भाविकांची दर्शनासाठी जी रांग पाहिली ती याआधी कधीही पाहिलेली नव्हती. मागच्या दोन दिवसांत 600 हून अधिक पुस्तकांची विक्री झाली. दोन वेळा पुस्तकांचा साठा मागवण्यात आला. तरीही खप अधिक असल्याने आता पुन्हा एकदा स्टाॅक मागवावा लागला.
– गजानन सुर्यवंशी ( दादर येथील गजानन बूक डेपोचे मालक)
( हेही वाचा: रायगडसह महाराष्ट्रातील या 14 किल्ल्यांना मिळणार जागतिक वारसा दर्जा? )
यंदा 50 टक्के अधिक मागणी
Join Our WhatsApp Communityहनुमान चालिसा पुस्तकाला यावेळी संपूर्ण राज्यभरातून अधिक मागणी आहे. तसेच, पुण्यात हनुमान चालिसाच्या पुस्तकाला सर्वाधिक मागणी आहे. दोन वर्षांच्या तुलनेत हनुमान चालिसाच्या पुस्तकांना यंदा 50 टक्के अधिक मागणी आहे.
– रविंद्र पेठे, धार्मिक प्रकाशनचे व्यवस्थापक