सिंधुदुर्गातील कोविड योद्ध्यांना न्याय मिळणार कधी?

सिंधुदुर्गात कोविड काळात अविरत सेवा पुरवण्यासाठी शासनाकडून कोविड सेंटर उभारण्यात आले होते. परंतु रुग्णांची अविरत सेवा करूनही, जवळपास २७२ कोविड योद्ध्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता शासनाकडून ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे अचानक कामावरून कमी केल्यामुळे या कर्मचाऱ्यांपुढे जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रूग्ण सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी ठिय्या आंदोलनही केले होते.

सेवा समाप्तीचा आदेश

कोरोना काळात विविध कोविड सेंटर कार्यरत ठेवण्यासाठी सिंधुदुर्गातून कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. पण अविरत सेवा देऊनही अचानक आलेला सेवा समाप्तीचा आदेश धक्कादायक आहे. असे मत येथील कोविड योद्ध्यांनी नोंदवले आहे. या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडून केव्हा न्याय मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जवळपास २७२ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. यामधील ५० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना आजतागायत थकीत पगारही शालनाकडून देण्यात आलेला नाही.

(हेही वाचा वीर सावरकर हे पर्मनंट भारतरत्नच! फडणवीसांनी खडसावले सेनेला)

योग्य मोबदल्याची मागणी

कोरोनाच्या काळात आम्ही घरदार सोडून काम केले. या सेवेत अनेक स्त्रियांनीही सेवा दिली. घरी लहानमुले असून, अनेक नागरिकांनी कंटाळून सेवा समाप्तीच्या आदेशाचेही पालन केले व इतरत्र नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. निदान आमच्या कामाचा योग्य मोबदला तरी द्यावा, अशी खंत ओरस रुग्णालयात चतुर्थ वर्ग सेवेत कार्य केलेल्या व सेवा समाप्त झालेल्या गौरव राणे यांनी व्यक्त केली आहे.

दोन महिन्यांपूर्वी केले होते ठिय्या आंदोलन

दरम्यान या कोविड योद्ध्यांनी दोन महिन्यांपूर्वी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनस्थळी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत, राज्य सरकारवर टीका केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here