गणपतीसाठी चाकरमान्यांकरिता कोकण रेल्वेची विशेष गाडी सोडण्याची मागणी

यंदा गणेशोत्सव ३१ ऑगस्ट रोजी असल्याने त्यापूर्वी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी दिवा ते सावंतवाडी विशेष गणपती स्पेशल जादा गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ज्यादा गाडीमुळे लाखो चाकरमान्यांना दिलासा

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणाचे नागरिक आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. आता कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु असला तरी, नियम शिथिल करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाण्यासाठी तजवीज करीत आहेत. गणेशोत्सवाच्या चार महिने आधीच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल होत असल्याने चाकरमान्यांचा हिरमोड होत आहे.

(हेही वाचा – गणेशोत्सवाला दादरहून कोकणात जाण्यासाठी २८ ऑगस्टला ‘मोदी एक्स्प्रेस’)

ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या कोकणवासींची संख्या मोठी असून ठाणे शहरातील कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण या भागातून दरवर्षी उत्सवासाठी नागरिक कोकणात जातात. या ज्यादा गाडीमुळे लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

गाणगापूर – गिरनार विशेष गाड्या

पौर्णिमेनिमित्त ठाणे-मुंबईहुन लाखो दत्तभक्त गाणगापूर आणि गिरनार येथे जात असतात. यावेळी मोठी गर्दी होत असून अनेकांना दत्तदर्शनाला मुकावे लागते. रेल्वे प्रशासनाने या स्थळांसाठीही विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here