जुन्या इमारतींच्या धर्तीवर डोंगराळ भागातील भिंतीचेही सर्वेक्षण करण्याची मागणी

सर्वात जास्त धोकादायक दरडी एस विभागात असूनही त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते, असे भाजपचे म्हणणे आहे.

महापालिका प्रशासन ज्याप्रमाणे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करते त्याच धर्तीवर दाट लोकवस्ती असलेल्या डोंगराळ भागातील संरक्षक भिंतींचे महापालिकेमार्फत तातडीने सर्वेक्षण करुन तेथील असुरक्षित व धोकादायक भागातील लोकांचे स्थलांतर केले जावे, अशी मागणी भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. तसेच जेणेकरुन जीवित व वित्तहानी टाळता येईल. या सर्व ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून तातडीने आवश्यक निधीची उपलब्धता केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

सर्वात जास्त धोकादायक दरडी एस विभागात

मुंबई शहरात १७ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. ही बाब अत्यंत दु:खद, वेदनादायी व क्लेशकारक असून मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला भूषणावह नाही. सर्वात जास्त धोकादायक दरडी एस विभागात असूनही त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता महापालिका प्रशासन नेमक्या काय उपाययोजना करणार असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत उपस्थित केला. तर याबाबत पुढील बैठकीत उत्तर दिले जाईल, असे प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी आश्वासन दिले.

(हेही वाचा : सायक्लॉन शेल्टर उभारणीत राज्य सरकारची हलगर्जी भोवली)

दरड कोसळून ३२ निरपराध नागरिकांचा बळी

यापूर्वी मालाड येथे महापालिकेच्या जलाशयाची भिंत कोसळून पाच निरपराध मुंबईकरांचा नाहक बळी गेला होता. पुन्हा एकदा चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ निरपराध नागरिकांचा बळी गेल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही दुर्लक्ष करणाऱ्या बेपर्वा प्रशासनाची उदासीनता आश्चर्यकारक व जीवघेणी असल्याची टीकाही प्रभाकर शिंदे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here