गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर प्रासंगिक स्वरूपात सोडण्यात येणारी मेमू कायम ठेवण्याची मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांकरिता मध्य आणि कोकण रेल्वेने रोहा-चिपळूण मेमू गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ८ डब्यांच्या या गाडीलाही गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्याला आणखी ४ डबे जोडून ती एकूण १२ डब्यांची चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११५७ आणि ०११५८ ही गाडी १९ ऑगस्टपासून १२ डब्यांची रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मुकादम यांनी केली आहे.
(हेही वाचा – आई आजारी आहे म्हणत राज्यातील ‘या’ 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक!)
२०२२ च्या गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे रोहा ते चिपळूण दरम्यान ३२ मेमू गाड्या चालवणार आहे. या ३२ जादा गाड्यांमुळे २०२२ मध्ये एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या १९८ होणार आहे. मेमू गणपती विशेष गाड्यांचे तपशील दिले आहेत ते खालील प्रमाणे.
०११५७ मेमू
दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२ पर्यंत, दि. २७.८.२०२२ ते ०५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) रोहा येथून दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी १३.२० वाजता पोहोचेल.
०११५८ मेमू
चिपळूण येथून दि. १९.८.२०२२ ते २१.८.२०२२, दि. २७.८.२०२२ ते ५.९.२०२२ आणि १०.९.२०२२ ते १२.९.२०२२ (१६ सेवा) पर्यंत दररोज १३.४५ वाजता सुटेल आणि रोहा येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.