वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्याच्या शालेय शिक्षण खात्याने इयत्ता १०वीची परीक्षा रद्द केली असून १२वीची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता २३ मे पासून राज्यभर इयत्ता ५वी आणि ८वीच्या विद्यार्थ्यांची होणारी शिष्यवृत्ती परीक्षाही स्थगित करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिक्षक आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
३३,२८१ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत!
२३ मे रोजी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून ऑफलाईन पद्धतीने त्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्याची कोरोना संसर्गाची गंभीर स्थिती पाहता हे विद्यार्थ्यांच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे ही परीक्षा तूर्तास स्थगित करावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर ही परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ५वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरता १६,६९३, तर ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरता १६,५८८ असे राज्यातील ३३,२८१ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेसाठी शाळा पुन्हा सुरु कराव्या लागतील, तसेच शिक्षकांना बोलावावे लागेल, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छापाव्या लागतील, उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करावे लागेल, या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा संपर्क वाढेल, त्यातून विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लहान मुलांना संसर्ग होत आहे, त्यामुळेसध्याची परिस्थिती शालेय विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे आहे, म्हणून ही परीक्षा रद्द करण्याची गरज आहे, असे भाजपच्या शिक्षक आघाडीचे म्हणणे आहे.
(हेही वाचा : ऑक्सिजन वितरणासाठी नॅशनल टास्क फोर्स बनवा! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश )
Join Our WhatsApp Community