पर्यटन, उद्योगधंदे यामध्ये वाढ होण्यासाठी नागपूर-मडगाव किंवा अमरावती- मडगाव रेल्वे सुरू करावी, अशी मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.
रेल्वे सेवा सुरू करावी
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. तेथे नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या भरपूर आहे. तसेच विदर्भातील संत गजानन महाराज मंदिर, संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, कार्तिकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्तस्थान, रेणुकामाता मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देण्यासाठी कोकणातील पर्यटक आणि भाविक जात असतात. याशिवाय कोकण आणि विदर्भ-मराठवाड्यात अनेक कृषी उत्पन्नांचे आदानप्रदान होत असते. त्याकरिता जलद आणि स्वस्त वाहतुकीचे साधन म्हणून रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. हंगामी स्वरूपात सुरू असणारी नागपूर मडगाव गाडी सतत भरून जाते.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण; ड्युटी शेड्युल बदलण्याची मागणी पूर्ण)
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन नागपूर किंवा अमरावतीहून मडगावसाठी नियमित गाडी सोडावी, अशी मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील सीताराम उत्तेकर, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार व्यास, शेगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर नागपाल, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस वैभव बहुतुले, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगावकर तसेच कोकणातील रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनाही दिली आहेत.
Join Our WhatsApp Community