KEM Hospital : केईएममधील डीन बंगला पाडणार, उबाठाने दिला महापालिकेला ‘हा’ इशारा

1468
KEM Hospital : केईएममधील डीन बंगला पाडणार, उबाठाने दिला महापालिकेला 'हा' इशारा

केईएम रुग्णालयाअंतर्गत (KEM Hospital) असलेला वैद्यकिय अधिष्ठाता (डीन) यांचा बंगला हा स्वातंत्र्य पूर्व काळापासून अस्तित्वात आहे. या वास्तूची निगा व डागडूजी अजूनही महानगर पालिकेच्या अखत्यारीत आहे. इंग्रज राजवटी पासून ऐतिहासिक परंपरा जपणारी ही स्वातंत्रपूर्व काळातील वास्तू आहे. देशाच्या इतिहासाचा ऐतिहासिक वारसा या वास्तूत दडलेला आहे, त्यामुळे त्यांची डागडूजी करुन त्याचे संवर्धन करणे आवश्यक असताना त्यावर हातोडा मारून हे बांधकाम तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. महापालिकेला बांधकामाकरता विविध पर्याय खुले असताना डीन यांचा बंगला तोडून ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा अट्टाहास प्रशासन का करते असा सवाल आता राजकीय पक्षाकडून केला जात आहे.

उबाठाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र लिहून केईएममधील डिन बंगला न तोडता त्यांचे संवर्धन करण्याची मागणी केली आहे. पुढील वर्ष हे केईएम रुग्णालयाचे शतकमहोत्सवी वर्ष आहे व या निमित्त प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. असे असताना केईएम रुग्णालयाचाच (KEM Hospital)  एक भाग असलेले ऐतिहासिक डीन बंगला तोडल्यामुळे चूकीचा संदेश जनतेमध्ये जाईल. केईएमच्या ऐतिहासिक परंपरेला ही अतिशय धक्कादायक बाब आहे. प्रशासनाचा मनमानी आणि जुलमी कारभाराचा पडवळ यांनी या पत्राद्वारे निषेध व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली ऐतिहासिक आठवणीचे जतन न केल्यास प्रशासनाच्या या जुलमी राजवटीचा विरोध करण्यासाठी जनआंदोलन करुन देशभक्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असे नमुद करत सचिन पडवळ यांनी प्रशासनाने अडेलतट्टू भूमिका सोडून ऐतिहासिक वारसा जपावा व या डीन बंगल्याचे अस्तित्व चिरकालीत रहावे, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. तसेच यापुढेही जर मुंबई महानगरपालिकेने आपले धोरण न बदलता डीन बंगला तोडण्यास मंजूरी दिल्यास उबाठा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन पक्षाच्या वतीने जनआंदोलन छेडले जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.

(हेही वाचा – लेफ्टनंट जनरल Sadhana Saxena Nair यांच्याकडे महासंचालक पदाची जबाबदारी, १ ऑगस्टला स्वीकारणार पदभार)

केईएम रुग्णालय रुग्णांसाठी आधारवड

मुंबई सारख्या शहरात गेली जवळपास १०० बर्षे रुग्ण सेवेसाठी देशभरात ख्याती असलेले महानगरपालिकेच्या मालकीचे के. ई. एम. रुग्णालय हे देशाच्या कानाकोपऱ्यातील रुग्णांसाठी एक आधारवड म्हणून प्रसिद्ध आहे. या रुग्णालयाचा बांधकामाचा वारसा अगदी इंग्रज राजवटी पासूनचा आहे. या रुग्णालया अंतर्गत असलेला वैद्यकिय अधिक्षक (डीन) बंगला हा स्वातंत्र्य पूर्व काळापासून अस्तित्वात आहे. या वास्तूची निगा व डागडूजी अजूनही मनपाच्या अखत्यारीत असून इंग्रज राजवटी पासून ऐतिहासिक परंपरा जपणारी ही स्वातंत्रपूर्व काळातील वास्तू आहे.

केईएमचे डिन बनले होते, गुजरातचे पहिले मुख्यमंत्री

ही वास्तू अनेक स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत या वास्तूचा उपयोग केला आहे. तत्कालीन डीन डॉ. जीवराज मेहता हे स्वतः केईएम रुग्णालयाचे (KEM Hospital) डीन असूनही त्यांनी त्या वेळी या चळवळीत भाग घेतला होता. येथूनच डॉ. जीवराज मेहता यांना इंग्रजांनी अटक करुन दोन वर्षांचा करावासाची शिक्षा झाली होती. पुढे स्वातंत्र्यानंतर हेच जीवराज गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा राहीले.

डिन बंगल्यात देशभक्तांच्या भावना

बॅरिस्टर एम. के. गांधी, पं. नेहरु, सरदार पटेल आदी सारखे भारत छोडो आंदोलनातील अग्रगण्य स्वातंत्र्य सैनिक भारत छोडो आंदोलना दरम्यान या वास्तूत वास्तव्यास होते. अशा प्रकारे भारतीयांचा समृद्ध इतिहास आणि वारसा सांगणारी ही सद्यस्थितीतील डिन बंगलो ही वास्तू ज्यामध्ये देशभक्तांच्या भावना, देशाच्या इतिहासाचा ऐतिहासिक वारसा दडलेला आहे ज्याची डागडूजी करुन त्याचे संवर्धन करणे आम्हा भारतीयांचे कर्तव्य आहे. स्वतंत्र हिन्दुस्तानच्या चळवळीचे वैभव जतन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे पडवळ यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.

ऐतिहासिक वैभवाला तोडण्याचे कटकारस्थानच

येणारे २०२४-२५ हे के. ई. एम. रुग्णालयाचे शतक महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यासाठी प्रशासन सज्ज होणे जरुरीचे आहे आणि अशा ऐतिहासिक वास्तूचे, वैभवाचे जतन करणे क्रमप्राप्त आहे.

सद्य परिस्थितीत मनपाच्या प्रशासकीय राजवटीला या गोष्टीचा विसर पडलेला दिसत आहे. किंबहुना अशा शतकमहोत्सवी वर्षात देशाच्या ऐतिहासिक वैभवाला तोडण्याचे कटकारस्थानच प्रशासकीय पातळीवर चालू आहे. या गोष्टीचे मला अतीव दुःख होत असून प्राध्यापकांच्या निवासस्थानाच्या गरजेपेक्षा डीनचा ऐतिहासिक बंगला तोडण्यात प्रशासनाला जास्त महत्वाचे वाटत आहे

डॉक्टरांच्या सेवा निवासस्थानासाठी अनेक पर्याय

सन २०१८ ते २०१९ या कालावधीत आय ए कुंदन याअतिरिक्त आयुक्त असताना त्यांच्या निर्देशनाखाली केईएम मधील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी केईएम (KEM Hospital)  मधील काही इमारती सी-१ व सी-२ कॅटेगरीमध्ये घोषित झाल्या होत्या. जर प्रशासनाला डॉक्टरांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करावयाची असेल तर अशा सी-१ व सी-२ कॅटेगरीमधील ज्या काही इमारती आहेत त्या इमारती पाडून त्या ठिकाणी बहुमजली टॉवर उभा करुन डॉक्टरांच्या निवासस्थानाची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे टाटा हॉस्पिटल समोरील परिसरात केईएमची स्टाफ क्वॉटर्स आहे ती सुध्दा तोडून त्या ठिकाणी स्टाफसाठी तसेच डॉक्टरांसाठी निवासस्थान बनविण्याचा पर्याय खूला आहे. यावर प्रशासनाने कामही चालू केले होते. परंतु तो प्रस्तावही प्रशासनाने बासनात गुंडाळला गेला आहे. त्यामुळे डीन बंगला पूर्णपणे जमीनदोस्त न करता त्याची योग्य ती डागडूजी करुन तो वापरात ठेवावा, अशी विनंती पडवळ यांनी या निवेदनात केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.