कोकणसह, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. तापमानाचा पाऱ्याने चाळीशी पार केल्याने अंगाची लाही लाही होत आहे. प्रचंड उकाडा आणि पावसाच्या सरी, असे संमिश्र वातावरण आहे. (Department of Meteorology)
हवामान विभागाने येत्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाची वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरीमध्येही पावसाचा अंदाज आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारी उन्हाच्या झळा जाणवतात. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर नागरिकांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाचा धुमाकूळ
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काहीत तालके तसेच जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीपिके आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. नाशिक जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, संभाजीनगर, जालना, सोलापूर, बुलढाणा, चंद्रपूर, बीड, गडचिरोली, सांगली आणि धाराशिव जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे.