अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाल्यानंतर, प्रवेश न घेतल्यास आणि अचानक प्रवेश रद्द केल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील तीनऐवजी आता एकाच फेरीत सहभागी होता येणार नाही. असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पुढील तीन फेरीपर्यंत प्रवेशासाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रतिबंध करण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर या महापालिका क्षेत्रांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेश राबवण्यात येते. सध्या या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी प्रक्रिया आणि अर्जाचा एक भाग भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आता नियमांत बदल
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पर्यायातील प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास, घेतलेला प्रवेश रद्द केल्यास किंवा महाविद्यालयाने प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्याला पुढील तीन प्रवेश फे-यांमध्ये सहभागी होण्याला बंदी होती. या विद्यार्थ्याला चौथ्या विशेष फेरीमध्ये सहभागी व्हावे लागत होते. मात्र या नियमात आता बदल करण्यात आला आहे.
( हेही वाचा: मशिदीत लाउडस्पीकरला परवानगी कोणत्या कायद्यानुसार? उच्च न्यायालयाचा सवाल )
महाविद्यालयांची संख्या वाढण्याची शक्यता
राज्य सरकारच्या 28 मार्च 2016 आणि 27 जानेवारी 2017 रोजीच्या निर्णयानुसार, मुंबई महानगर क्षेत्र पुणे, महापालिका क्षेत्रातील वगळण्यात आलेल्या गावांचा इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात यावा, असाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इनहाउस कोट्यांतर्गत प्रवेश कोणत्याही टप्प्यावर करण्याची व जागा प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, असेही निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.