कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला संकुलातील विलासराव देशमुख पार्कची सुधारणा आता करण्यात येणार असून या पार्कला नवे स्वरुप निर्माण करून दिले जाणार आहे. या पार्कातील अंतर्गत सुधारणा करण्यात येणार असल्याने ते आता अधिक आकर्षक दिसणार असून तिथे खेळण्यास येणाऱ्यांचा आनंदात अधिकच भर पडणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून या पार्कच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित होता.
(हेही वाचा – बाळासाहेबांच्या पुतळ्याला महापालिका सभागृहात जागा नाही!)
पार्कच्या विकासासाठी ३.३६ कोटींचा खर्च
लोखंडवाला संकुलातील विलासराव देशमुख पार्कमधील दुरवस्था आणि गैरसोयींबाबत स्थानिक भाजप नगरसेविका सुरेखा पाटील यांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. मात्र, कोविडमुळे या पार्कच्या विकासाचे काम रखडले होते. परंतु यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून त्यामध्ये मानश कंस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली आहे. महापालिकेने या पार्कच्या विकासाठी ४.८८ कोटींचा खर्च अंदाजित धरला होता. परंतु कंत्राटदाराने त्यापेक्षा ३३.८८ टक्के कमी दराने बोली लावली आहे. त्यामुळे या पार्कच्या विकासासाठी ३.३६ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
अशा कामांचा आहे समावेश
या पार्कच्या विकास कामांमध्ये प्रवेशद्वार सुशोभित करणे, सुरक्षा चौकीची दुरुस्ती करणे, संरक्षण भिंतीची दुरुस्ती करणे, जाळ्या लावणे, पर्जन्य जलवाहिनी बसवणे, अंतर्गत पदपथांची दुरुस्ती करणे, मैदानात लाल माती पुरवणे, मुलांना खेळण्याच्या जागेची निर्मिती करणे, खुली व्यायाम शाळा उभारणे, गझेबो पुरवणे, सजावटीचे दिवे व बैठक आसने बसवणे आदी कामांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community