मुंबईतील १२९ वर्षे जुन्या असलेल्या पुरातन महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेत इमारतीच्या मंगलोरी कौलांसह छत आणि भिंतीची डागडुजी करण्यात आली असली तरी या छतातून गळतीचे प्रमाण सुरुच आहे. आयुक्तांच्या दालनाच्या डाव्या आणि उजव्या बाजुच्या व्हरांड्यातच छतातून गळती होत असल्याने गळणारे पाणी जमा करण्यासाठी प्लास्टिकच्या बादल्या ठेवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
मुंबईचे दमट हवामान व सततच्या ऊन पावसामुळे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला असलेल्या दगडी भिंतीवर रासायनिक प्रक्रिया होऊन, इमारतीच्या दगडांना बुरशी येणे, दगडांच्या खाचांमध्ये वनस्पतींची वाढ होणे, नवीन भेगा तयार होणे, दगडांचे आवरण झिजणे आदी बाबींमुळे इमारतीचा बाहेरील भाग खराब दिसतो. ज्यामध्ये घुमट, तुळ्या, कमानी आदी बांधकामांच्या भागांची विशेष दुरुस्ती करून इमारतीचे आयुष्य वाढवणे तसेच अनेक ठिकाणाहून होणारी गळती थांबवण्यासाठीची प्रकिया करणे आदी कामांच्या दृष्टीकोनातून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले. यासाठी एम देवांग कन्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीच्या माध्यमातून विविध करांसह ९ कोटी ९२ लाख रुपये खर्च केले जात आहे.
या नुतनीकरण तथा दुरुस्तीच्या कामामध्ये मंगलोर छत व त्यांच्या लाकडी बांधकामांची दुरुस्ती, छतावरील लाकडी फळ्या काढून दुरुस्ती करणे व नवीन बसवणे, छतांची गळती बंद करणे, बाथरुममधील गळती दुर करणे, लाकडी मजल्यांच सांधे स्टेनलेस स्टील अथवा लोखंडी प्लेट द्वारे मजबूत करणे आदी प्रकारच्या सामावेश होता. हे काम जी २० च्या शिखर परिषदेच्या शिष्टमंडळाच्या महापालिका मुख्यालयातील आगमनापूर्वी अत्यंत घाईघाईत दीड महिन्यांमध्ये पूर्ण केले. परंतु सपूर्ण इमारतीची रखरखाव करताना छताचे काम योग्यप्रकारे न झाल्याने दुसऱ्या मजल्यावर उपमहापौरांच्या कार्यालयाबाहेर छतातून गळती लागलेली आहे.
(हेही वाचा – पडताळणी न करता ११ पोलीस प्रमाणपत्रे करण्यात आली जारी, पोलीस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात)
तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका वस्तूसंग्रहालयात शेजारी व महापालिका आयुक्तांचे पत्र व्यवहार स्वीकारण्याच्या कार्यालयाशेजारी छतातून पाण्याची गळती होत आहे. या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या गळतीचे पाणी इतरत्र कुठे पसरु नये म्हणून बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. या मुख्यालयातील बाथरुमच्या दुरुस्तीचे काम करण्यात आल्या नसल्याची तक्रारी येत असतानाच आता महापालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतीत लागलेल्या गळतीमुळे पुन्हा एकदा घाईघाईत केलेल्या या कामाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे शिखर परिषदेसाठी मुख्यालय इमारतीचे काम घाईघाईत करताना छताच्या कामांकडे गांभिर्यपूर्वक पाहिले नाही असा सवाल आता कर्मचाऱ्यांकडूनच केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community