गेल्या काही दिवसांपासून त्याआधीच मुंबईतील हवेचा खालावलेला दर्जा ही चिंतेची बाब ठरली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी केवळ रात्री ८ ते १० अशी दोन तासाचं परवानगी दिली होती. मात्र नागरिकांनी हे नियम सर्रास धाब्यावर बसविल्याचे सर्वत्र अनुभवायला आले. रात्री १० नंतरही फटाक्यांचा धूमधडाका सुरूच होता. अगदी पहाटेपासूनच काही भागांमध्ये मोठ्या आवाजाचे आणि धुराचे फटाके फोडले गेले. (Air Pollution )
मुंबईमध्ये दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रदूषण वाढत असते. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे हवेतील प्रदूषके वाहून गेली आणि मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली. गेले तीन दिवस हवा समाधानकारक श्रेणीवर असली तरी रविवारी पहाटेपासूनच मोकळी मैदाने, इमारतींच्या गच्च्या येथे फटाक्यांच्या जोरदार आतषबाजी सुरू झाली. परिणामी हवेचा दर्जा पुन्हा खालावला. सायंकाळी शहरातील बहुतेक भागांत धुराचे साम्राज्य पसरल्याचे बघायला मिळाले. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी शोभेचे, आकाशात फुटणारे फटाके अधिक दिसत होते. वाहतुकीच्या गोंधळातच अनेक ठिकाणी रस्त्यातच फटाके फोडले जात होते. त्यामुळे कोंडीमध्ये भर पडली. परिणामी फटाक्यांच्या आवाजामध्ये वाहन्यांच्या भोंग्यांनी ध्वनीप्रदुषणातही भर घातली.
(हेही वाचा : GramPanchayat Election 2023: ठाकरे, पवार गटाचे मेरिट घसरले)
पोलिसांचे प्रयत्न, पण अपुरे !
काही संवेदनशील ठिकाणांवर फटाके वाजवण्यास पोलीस लोकांना मज्जाव करीत होते. न्यायालयाने लागू केलेले वेळेचे निर्बंध पाळले जावेत म्हणून पोलीसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र गल्ली-बोळात किंवा सोसायट्यांमध्ये अगदी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत फटाके उडवले जात असताना या सर्वांना अडविण्यास पोलिसांची यंत्रणा अपुरीच ठरली.
हवेचा दर्जा पुन्हा खालावला
गुरुवार आणि शुक्रवार मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा शिडकावा झाला. मात्र, दिवाळीच्या पहिल्या दिवशी रविवारी मुंबईतील हवेचा दर्जा खालावला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्वरुपाची होती. भायखळा येथे रविवारी वाईट हवेची नोंद झाली. तिथे हवा गुणवत्ता निर्देशांक २१२ नोंदवला गेला. मिरा भाईंदर येथे २११, विलेपार्ले येथे २०३, मालाड येथे २१० होता. पावसाच्या शिडकाव्यामुळे सुधारलेली हवा फटाक्यांनी पुन्हा खराब केली.