ठाणे- दिवा या दरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेवर सर्वात मोठा 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे ते दिवा या स्थानकांदरम्यान ही पाचवी आणि सहावी मार्गिका तयार करण्यात आली आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या आणि उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीसाठी या स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. परंतु लांब पल्ल्याच्या गाड्या या दोन नव्या मार्गिकांवरून सोडल्या जात असल्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडत आहे. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक! पहा वेळापत्रक… )
प्रवाशांना सर्वाधिक फटका
गेल्या काही वर्षांपासून उपनगरीय रेल्वे गाड्यांध्ये अतिरिक्त गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. तसेच रेल्वे अपघातामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने गाड्यांची सेवा वाढविणे आणि रेल्वे वेळापत्रक सुधारण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाच आणि सहा या दोन नव्या मार्गिका बनविण्याचा निर्णय घेतला होता. २००८ मध्ये या मार्गिकेच्या कामास मंजुरी मिळाली होती. मात्र, या मार्गिका सुरू होण्यास १४ वर्षे लागली. २०२२ मध्ये या मार्गिका सुरू झाल्यानंतर प्रशासनाने वेळापत्रक सुधारणा आणि अतिरिक्त गाड्यांऐवजी वातानुकूलित रेल्वे सुरू केल्या त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे.
प्रवासी संघटना नाराज
यावर प्रवासी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपनगरीय गाड्यांमधून रेल्वेला सर्वाधिक महसूल प्राप्त होतो. मात्र असे असूनही लांब पल्ल्याच्या गाड्यांना अधिक प्राधान्य प्रशासनाकडून दिले जाते आणि मुंबईकर प्रवाशांचे हाल रेल्वे अधिकाऱ्यांना दिसत नाहीत. असा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. तसेच केवळ लांब पल्ल्याच्या गाड्या नव्या मार्गिकांवरून धावत असतील तर ही प्रवाशांची फसवणूक आहे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी सुद्धा प्रवासी संघटनांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community