कोरोना काळात ती झाली बेघर… दिला ‘देवामृत’ने हात!

प्रिया जाधव व त्यांचे सहकारी या महिलेवर पुढील सर्व वैद्यकीय उपचार करुन, तिला आपला जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पतीच्या निधनानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला अगदी वाऱ्यावरच सोडले. भावानेही मदतीचा हात न दिल्याने, तिला घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बेघर होत रस्त्यावरील जीवन जगणाऱ्या त्या महिलेला, अखेर देवामृत फाऊंडेशनने मदत केली. त्यामुळे तिला जोगेश्वरीतील केंद्र सरकारच्या सखी वन स्टॉप सेंटरमधील तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले. स्वत:चे घरदार सर्व काही असतानाही तिला भिकाऱ्यासारखे जीवन या कोरोनाच्या काळात जगावे लागत होते. पण या समाजात आजही माणुसकी शिल्लक असून, प्रिया जाधव व त्यांचे सहकारी या महिलेवर पुढील सर्व वैद्यकीय उपचार करुन, तिला आपला जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

महिलेला घरच्यांनी सोडले वा-यावर

मंगळवारी रात्री साधारणत: बारा वाजण्याच्या सुमारास भांडुप येथील साईविहार नाका येथे एक महिला थोड्याफार प्रमाणात मनोरुग्ण अवस्थेत आढळून आली. मागील सलग दोन दिवस ही महिला इथेच येऊन बसत असल्याने विभागातील नागरिकांनी तिला जेवण तसेच वस्तू देण्याचा प्रयत्न केला. परंतु परवा रात्री ही महिला तिथेच असल्याने स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनुसार, देवामृत फाऊंडेशनच्या प्रिया जाधव यांनी त्या महिलेची विचारपूस केली. तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याकडे स्वत:चे आधार कार्ड, पॅनकार्ड, नवऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र अशी काही कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे त्यांनी या महिलेला सोबत घेत भांडुप पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिस ठाण्यातून त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांनी मात्र ती वेड्यासारखी करते असे सांगून, आम्ही तिला घरात घेणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने अखेर या महिलेला सखी वन स्टॉप सेंटरमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले आहे.

(हेही वाचाः टाळी वाजवणा-यांना मिळाले मदतीचे ‘हात’, हिंदुस्थान पोस्टच्या वृत्ताने घडला चमत्कार!)

देवामृतची मदत

देवामृत फाऊंडेशनच्या संस्थापक प्रिया जाधव यांनी याबाबत खेद व्यक्त केला. कारण काहीही असूदे मात्र, दोन सख्ख्या भावांनी आपल्या बहिणीला रस्त्यावर सोडणे म्हणजे रक्ताची नाती संपुष्टात येण्यासारखेच असल्याचे म्हटले आहे. परवा रात्री साधारण बाराच्या आसपास राहुल हडकर यांचा फोन आला. साईविहार नाका येथे एक महिला थोड्याफार प्रमाणात मनोरुग्ण असलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. राहुल हडकर यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांनी या महिलेबाबत माहिती दिली होती. पुरुषोत्तम प्रभु, आदीक पवार, चेतन घोगळे, संतोष पवार यांनी गेले दोन दिवस या महिलेच्या जेवणाची सोय केली. महिला असल्याने देवामृत फाऊंडेशनच्या माध्यमातून सहकार्य घेण्याचे त्यांनी ठरवले. रात्रीची वेळ असल्याने राहुल हडकर, स्वप्नील तावडे, विश्वास दाते, प्रसाद हुर्णे, ओमकार जाधव ही संपूर्ण टीम केवळ त्या महिलेला योग्य ठिकाणी सुखरुप पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत होते, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

कोण आहे ही महिला?

या महिलेची चौकशी करत असताना तिच्याशी संवाद साधत असताना, अनेक गोष्टींची उकल होत गेली. तिचे नाव संगिता शिर्के असल्याचे समजले. तिच्याजवळ असलेल्या सामानात तिची सगळी कागदपत्रे होती. त्यावरुन भांडुप मध्येच राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांची ओळख पटली. अधिक माहीतीवरुन त्या महिलेचा दहा वर्षांचा मुलगा बदलापूरमधील एका आश्रमात असल्याचे समजले. तिच्या नव-याचेही निधन झाल्याचे समजले. रात्रीची वेळ आणि ती महिला असल्या कारणाने तिला भांडुप पोलिस स्टेशनला नेले. सकाळी चार वाजेपर्यंत आमची तिथे हजेरी लागली होती. त्या महिलेचे नातेवाईक येण्यास तयार नव्हतेच. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शैलेश शिंदे यांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवताच ते नातेवाईक भांडुप पोलिस ठाण्यात हजर झाले.

देवामृतचा निर्धार

सामाजिक कर्तव्य म्हणून आणि सद्य परिस्थितीत तिला शासनाच्या सखी वन स्टॉप सेंटरमध्ये तात्पुरता निवारा दिला आहे. पण तिच्या मुलाचेही रितसर पुनर्वसन झाले आहे की नाही, याची योग्य माहिती मिळवून लवकरच तिलाही कायमस्वरुपी निवाऱ्याची सोय आपण उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रिया जाधव यांनी सांगितले. त्यामुळे तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करुन, तिला तिचा जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न असल्योचही त्यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here