अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या शारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन, व्रत, भजन केले जाते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळे रंग, भोग आणि फूलांची सजावट करुन देवी मातेला प्रसन्न केले जाते. नवरात्री पूजन, व्रत केल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. नवरात्रोत्सवात नऊ कुमारिकांना बोलावून त्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाला आज म्हणजेच गुरुवार 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे नवरात्रातील प्रत्येक दिवशी कुठल्या देवीची पूजा बांधायची, दिवसाचा रंग कोणता, त्याचे महत्त्व काय, याबाबतची संपूर्म माहिती जाणून घ्या.
(हेही वाचाः नवरात्रोत्सवापूर्वीच कोविडबाधित रुग्णांचा आकडा सहाशेपार)
पहिला दिवस:
IIॐ देवी शैलपुत्राय नमःII
रंग: पिवळा
भोग: “शुद्ध तूप”
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्या देवी ‘शैलपुत्री’ची उपासना केली जाते. देवीला “शुद्ध तूप”अर्पण करुन निरोगी आयुष्याची प्रार्थना केली जाते.
दुसरा दिवस:
IIॐ देवी ब्रह्मचारिण्यै नम:II
रंग : हिरवा
भोग : “साखर व पंचामृत”
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई ‘ब्रम्हचरणी’ची पूजा केली जाते. ब्रम्हचरणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी. या दिवशी देवीला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या रंगाचे हार, तसेच साखर व पंचामृताचा नैवेद्य अर्पण करतात.
(हेही वाचाः यंदा गरबा खेळता येणार? वाचा नवरात्रोत्सवासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना)
तिसरा दिवस :
IIॐ देवी चन्द्रघण्टायै नम:II
रंग : राखाडी
भोग : “दूध व दूधापासून तयार केलेले पदार्थ”
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ‘चंद्रघंटा’ देवीची पूजा केली जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. देवीला दूध किंवा दूधापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात.
चौथा दिवस :
IIॐ देवी कुष्माण्डायै नम:II
रंग : केशरी
भोग : “मालपोहे”
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ‘कुष्मांडा’देवीची पूजा केली जाते. सृष्टी अस्तित्वात नव्हती तेव्हा ‘कुष्मांडा’ देवीने आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून तिला सृष्टीची आद्यशक्ती असे म्हटले जाते. देवीला मालपोह्याचा नैवेद्य अर्पण करतात.
पाचवा दिवस :
IIॐ देवी स्कंदमातायै नम:II
रंग : पांढरा
भोग : “केळी”
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ देवीची पूजा केली जाते. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गामातेच्या या रुपाला ‘स्कंदमाता’ म्हटले जाते. देवीला भोग म्हणून केळी किंवा केळ्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात. देवी कमळावर विराजमान असून मनोभावे आराधना केल्यास शौर्यगुण वाढीस लागतात.
(हेही वाचाः अमेरिकेनेही केला हिंदू संस्कृतीचा ‘उदो उदो’! ‘या’ राज्यांत होणार हिंदू वारसा महिना साजरा)
सहावा दिवस :
IIॐ देवी कात्यायन्यै नम:II
रंग : लाल
भोग : “मध”
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या सहाव्या रुपाचे म्हणजेच आई ‘कात्यायनी’देवीची पूजा केली जाते. देवीला लाल व पिवळ्या रंगाची फुले अर्पण करुन, मधाचा नैवेद्य ठेवावा. कात्यायनदेवीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते.
सातवा दिवस :
IIॐ देवी कालरात्र्यै नम:II
रंग : निळा
भोग : “गूळ”
कालरात्रीदेवीचे रुप सर्वात शक्तीशाली मानले जाते. सातव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. निळे वस्त्र परिधान करुन देवीला गूळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात. या देवीची उपासना केल्यामुळे जीवनात आलेल्या संकटांपासून मुक्ती मिळते.
आठवा दिवस :
IIॐ देवी महागौर्ये नम:II
रंग : गुलाबी
भोग : “नारळ”
नवरात्रीच्या आठव्या दिवशी ‘महागौरी’ची पूजा केली जाते. नारळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करुन देवीची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते.
(हेही वाचाः भारत सरकारने बनवलेली सोन्याची नाणी कुठे मिळतात माहीत आहे का? वाचा)
नववा दिवस :
IIॐ देवी सिध्दिदात्र्ये नम:II
रंग : जांभळा
भोग : “तीळ”
नवरात्रीच्या नवव्या म्हणजेचं शेवटच्या दिवशी ‘सिद्धीदात्री’ देवीची पूजा केली जाते. या देवीला सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. नवरात्रात महानवमीला अनन्यसाधारण महत्व आहे. देवीला तीळ किंवा तीळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा.