यंदाच्या अधिक मासात विठ्ठलभक्तानी तब्बल 7 कोटी 19 लाखांचे भरभरून दान पांडुरंगाच्या चरणी अर्पण केले आहे. यावर्षी १८ जुलै रोजी अधिक महिन्याला सुरुवात झाली आणि 16 ऑगस्ट रोजी समाप्ती झाली. पहिल्या दिवसापासून रोज आषाढी यात्रेसारखी गर्दी पंढरपुरात दिसत होती. या महिनाभरात जवळपास 1 कोटी भाविकांनी पंढरपुरात येऊन विठूरायाचे दर्शन घेतले. त्यामुळेच 2018 साली झालेल्या अधिक महिन्याच्या तिप्पट भाविकांनी यंदा या तीर्थक्षेत्री दर्शन घेतले. या अधिक महिन्यात विठुरायाच्या खजिन्यात 7 कोटी 19 लाख 43 हजार 37 रुपयांचे दान जमा झाले आहे. सन 2018 सालच्या तुलनेत यावर्षी 4 कोटी 86 लाख 91 हजार 113 रुपयाने उत्पन्न वाढले आहे. गेल्या अधिक महिन्यात म्हणजे 2018 साली देवस्थानला 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
अधिकमासात सोने-चांदीच्या वस्तू दान करण्याची प्रथा आहे. यंदा 24 लाख 98 हजार 890 रुपयांचे सोने आणि 8 लाख 18 हजार 859 रुपयाची चांदी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्यात आली. पांडुरंगाच्या चरणावर 54 लाख 82 हजार, तर रुक्मिणी मातेच्या चरणावर 19 लाख 12 हजार रुपयाचे दान अर्पण करण्यात आले होते. या महिनाभरात देवाच्या लाडू प्रसादातून 87 लाख 73 हजार रुपयाचे उत्पन्न मंदिराला मिळाले आहे.
Join Our WhatsApp Community