Vitthal Mandir : तब्बल 79 दिवसांनी पंढरपुरात भाविकांना विठुरायाला करता येणार चरण स्पर्श

193
तब्बल 79 दिवसानंतर २ जूनपासून पुन्हा एकदा पंढरपुरात विठुरायाच्या पायावर डोके टेकवून दर्शनास घेता येणार आहे. दरम्यान, आचारसंहिता असल्याने विठ्ठलाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार नसून देवाची पूजा मंदिराच्या (Vitthal Mandir) पुजाऱ्यांच्या हस्तेच केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. संवर्धनाच्या कामामुळे मंदिर 15 मार्चपासून देवाच्या पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळ भाविकांना मुखदर्शन व्यवस्था ठेवली होती. आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत आल्याने आता भाविकांना थेट पायावर डोके ठेवून दर्शन करता येणार आहे. यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे.

मंदिराचे ७०० वर्षांपूर्वीचे रूप पाहता येणार 

या सोहळ्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समिती सदस्य, मंदिर सल्लागार समिती सदस्य, जिल्हाधिकारी आणि सर्व प्रमुख फडकरी यांना निमंत्रित केले आहे. सध्या आचारसंहिता सुरु असल्याने जरी पालकमंत्री अथवा मंदिर समिती अध्यक्ष उपस्थित असले तरी विठूरायाची सकाळची नित्यपूजा मंदिर (Vitthal Mandir) समितीच्या पुजाऱ्यांच्याच हस्ते केली जाणार आहे. ही पूजा सुरु असताना पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवर हे समोर बसून राहणार आहेत. आता विठ्ठल सभामंडपाचे काम सुरु असून हे पूर्ण होण्यास 30 जून उजाडणार असल्याने आता देवाच्या मुखदर्शनाची व्यवस्था पर्यायी मार्गाने करण्याचे नियोजन समितीने केले आहे. विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्यासाठी सुरु असलेल्या कामांपैकी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, बाजीराव पडसाळी वगैरे भागाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 2 जूनपासून भाविकांना विठुरायाचे मूळ दगडी गाभाऱ्यात तर दर्शन घेता येणारच आहे. शिवाय  विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.