आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांची ‘नो- मोबाईल नेटवर्क’पासून सुटका! प्रशासनाकडून विशेष सुविधा

134

कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या मार्गावरील सर्व रस्त्यांचा यंदा कायापालट झाल्यामुळे यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना याचा लाभ मिळणार आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच, गेली अनेक वर्षे मोबाईल नेटवर्किंगची समस्या सोडविण्यात आली असून आंगणेवाडी परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे.

( हेही वाचा : Budget 2023 : तंत्रज्ञान क्षेत्राला अर्थसंकल्पातून काय मिळणार? बजेटकडे देशाचे लागले लक्ष)

२५ जिओ मोबाईल व्हॅन उपलब्ध

मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. स्थानिक गावक-यांसह भराडी देवीच्या यात्रेकरता लाखो चाकरमानी सुद्धा कोकणात दाखल होतात. परंतु, आंगणेवाडी परिसरात गेली अनेक वर्षे मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे, आंगणेवाडी यात्रेकरिता येणाऱ्या लाखो भाविकांना यंदा “नो-नेटवर्क” असलेल्या या परिसरात आता मोबाईल नेटवर्कची सुलभता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, आंगणेवाडी साठी येणाऱ्या भाविकांना यात्रेचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा आनंद मिळणार आहे, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.