संसर्गजन्य आजारांबद्दल आयुर्वेदाने सखोल विचार केलेला आहे, असे स्पष्ट करत मुळात जगातील पहिले वैद्यक शास्त्र हे आयुर्वेद असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रीय आयुर्वेद गुरू वैद्य विनय वेलणकर यांनी शनिवार २२ ऑक्टोबर २०२२ रोजी धन्वंतरी पूजनाच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद दिनी केले. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात धन्वंतरी पूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आयुर्वेदाबाबत मार्गदर्शन
हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, आयुर्वेद विज्ञान मंडळ आणि वैद्यराज व्हिजन यांच्या संयुक्त समन्वयाने गेल्या काही वर्षांपासून आयोजित केला जातो. या निमित्ताने आयुर्वेदाचा प्रसार व्हावा, लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली जातात. यावेळी संसर्गजन्य आजार आणि आयुर्वेद या विषयावर वैद्य. विनय वेलणकर यांचे बहुमोल व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आरोग्य वृद्धी, संरक्षण आणि दिनचर्येतून आरोग्य रक्षण या विषयीही त्यांनी यावेळी बहुमोल माहिती, मार्गदर्शन व्याख्यानातून केले.
व्याख्यानाच्या सुरुवातील धन्वंतरी पूजन करण्यात आले. राष्ट्रीय आयुर्वेद दिन, तो ही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आणि राष्ट्रीय आयुर्वेद गुरू वैद्य विनय वेलणकर यांचे व्याख्यान असा संगमच यावेळी जुळून आला होता. वैद्य राजीव कानिटकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे स्वागत वैद्य नंदकुमार मुळे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, तसेच सावरकर स्मारकाचे विश्वस्त आणि ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य चिंतामण साठे उपस्थित होते. यावेळी सावरकर स्मारकाच्यावतीने वैद्य वेलणकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा आणि पुस्तक भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी वैद्यराज व्हिजनच्या दिवाळी अंकाचेही प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
Join Our WhatsApp Community