“सर्वेक्षण झाले तरच पुढच्या पुनर्विकास प्रक्रियेला वेग येईल आणि आम्हाला आमचं हक्काचं घर मिळू शकेल. त्यामुळे या प्रक्रियेत अडथळा आणू नका” असा सज्जड दम देत धारावीतील स्थानिकांनी, धारावी बचाव आंदोलन ( डीबीए) कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. धारावीतील सेक्टर 2 मधील राजीव गांधी नगर परिसरात बुधवारी सकाळी घरांवर नंबर टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना तिथे पोहोचून डीबीए कार्यकर्त्यांनी ही प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी इथल्या चाळींमध्ये जाऊन स्थानिकांना पुनर्विकासाविरोधात भडकावण्याचा प्रयत्न या कथित कार्यकर्त्यांनी सुरू केला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत या कथित कार्यकर्त्यांना जाब विचारला.
स्थानिकांचा हा आक्रमक पवित्रा पाहून या कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला आणि त्यानंतर पुन्हा घरांवर नंबर टाकण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. या संदर्भात धारावी रिडेव्हलमेंट प्रोजेक्ट ( डीआरपी ) च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा प्रकार आज सकाळी घडला असल्याची पुष्टी केली. मात्र झाल्या प्रकारावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
झोपडपट्टीतून बाहेर काढून नवे घर देणार आहेत का?
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या झोपड्यांमध्ये राहतोय. गेल्या वर्षापासून या प्रक्रियेला वेग आलाय. पण काही लोक विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. या लोकांमुळेच सर्वेक्षण प्रक्रिया थांबवण्यात आली. जे लोक या पुनर्विकासाला विरोध करताहेत ते लोक आम्हाला या झोपडपट्टीतून बाहेर काढून नवे घर देणार आहेत का? आमच्या अजून किती पिढ्यांनी या झोपड्यांमध्ये संसार करायचा???
-स्थानिक रहिवासी
आम्हाला लवकरात लवकर धारावीचा पुनर्विकास हवाय
स्थानिकांच्या भावना लक्षात न घेता विनाकारण आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्या या कथित कार्यकर्त्यांना आम्ही आमच्या चाळीतून हाकलवून लावले. आम्हाला कोणत्याही राजकारणात पडायचे नाही. आम्हाला लवकरात लवकर धारावीचा पुनर्विकास हवाय. सरकारने आमच्या भावनांचा विचार करून लवकर योग्य ती कारवाई करावी.
-स्थानिक रहिवासी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community