‘हे’ 15 दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यासाठी मुभा…

157

केंद्र सरकारच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार विविध तरतुदीनुसार धुळे जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराचे वर्षभरातील 15 दिवस जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी निश्चित केले आहेत. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने प्राधिकृत केले आहे. त्यानुसार ध्वनी प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीतील 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

तसेच अशी सवलत देताना अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावयाच्या अटी घालण्यात याव्यात. तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक वापराबाबतची सवलत 15 दिवसांपेक्षा जास्त होणार नाही. राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्र नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची परवानगी देताना ध्वनी प्रदूषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे. त्यानुसार 2021 मधील धुळे जिल्ह्यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा महिलांशी अश्लाघ्य वर्तन करून ‘तो’ करायचा चोरी!)

या दिवसांसाठी दिली सूट

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत सूट दिलेले दिवस असे : शिवजयंती (1 दिवस), ईद- ए- मिलाद (1 दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1 दिवस), 1 मे महाराष्ट्र दिवस (1 दिवस), गणपती उत्सव (4 दिवस, पाचवा, सातवा, नववा दिवस व अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव (2 दिवस, अष्टमी व नवमी), दिवाळी (1 दिवस), ख्रिसमस (1 दिवस), 31 डिसेंबर (1 दिवस). उर्वरीत तीन दिवसांबाबतची परवानगी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमांसाठी आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे.

…तर कारवाई होणार

केंद्र सरकारच्या अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदींचे उल्लंघन होणार नाही व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावयाच्या अटी उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणसंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत ध्वनी प्रदूषण नियम 2000 चे पालन करण्यात यावे. नियमातील कोणत्याही तरतुदींचा भंग झाल्याचे आढळून आल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 15 अन्वये कारवाईस संबंधित पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.