राजधानी दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 जुलै रोजी करण्यात आले. भव्य दिव्य अशा या अशोक स्तंभातील सिंहांच्या भावमुद्रेवरुन एक नवा वाद सुरू झाला आहे. अशोक स्तंभातील सिंहांच्या मुद्रेवरुन अपप्रचार करण्यात येत आहे. याचबाबत आता शिल्पकार सुनिल देवरे यांनी बाजू मांडली आहे. राष्ट्रीय चिन्हात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन संसद भवनातील अशोक स्तंभात असलेल्या सिंहांची मुद्रा ही काहीशी आक्रमक आणि क्रोधित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. देशाचे राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोक स्तंभावरील सिंहांची भावमुद्रा ही खूप शांत आणि संयमी असल्याचे सांगत या नव्या राष्ट्रीय प्रतिकावर आक्षेप घेण्यात येत आहे. पण याचबाबत शिल्पकार सुनिल देवरे यांनी आपली बाजू मांडली आहे.
आक्षेप तथ्यहीन
ही मूर्ती घडवताना आपण मोठे संशोधन केले आहे. या अशोक स्तंभाचा फोटो वेगवेगळ्या अँगलने घेतल्यास तो आपल्याला वेगवेगळा दिसतो. या अशोक स्तंभाचा आपण लांबून फोटो घेतला तर ते पूर्णपणे अशोक स्तंभातील सिम्बॉलशी मॅच होईल. त्यामुळे या शिल्पाबाबत घेण्यात येणारे आक्षेप हे चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले आहे.
शांतीचा संदेश देणारे शिल्प
या शिल्पाची प्रतिकृती बनवताना आम्ही प्रत्येक बारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. हे शिल्प दुरून पाहण्यात येणार आहे. मूळ शिल्प हे 2 ते 3 फूट एवढ्या उंचीचे असून हे नवे शिल्प 7 मीटर उंच आहे. त्यामुळे यात फरक दिसून येत आहे. या शिल्पातून शांतीचा संदेश देणं गरजेचं असल्यामुळे ही कलाकृती बनवताना त्याचा विचार करण्यात आल्याचे शिल्पकार सुनिल देवरे यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community