मुंबईत सध्या ६० वर्षांवरील व्यक्तींचा लसीकरणाचा प्रतिसाद कमी दिसून आल्याने आता ४५ वर्षांच्या पुढील वयोगटातील व्यक्तींसाठी थेट केंद्रावर जावून लसीकरण करता येणार आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींना सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवशी ऑन स्पॉट वॉक इन पध्दतीने थेट लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. तर उर्वरीत तिन्ही दिवशी नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे लागणार आहे.
सोमवार, मंगळवार, बुधवारी नोंदणी न करता होणार लसीकरण!
मुंबई महापालिकेने कोविड १९च्या लसीकरणासाठी सुधारीत मार्गदर्शक सुचनेमध्ये बदल केला असून याचे सुधारीत परिपत्रक जारी केले आहे. सध्या ६० वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींना सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवशी थेट लसीकरण केंद्रावर जावून लस घेता येत होती. त्यानुसार आतापर्यंत ६० वर्षांवरील सुमारे ११ लाख लोकसंख्येपैकी ८ लाख ५३ हजार एवढ्या लोकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. त्याचप्रमाणे या वयोगटातील प्रतिदिन ७ हजार लाभार्थीच लाभ घेत आहेत.
(हेही वाचा : संभाजी राजेंना पंतप्रधानांची भेट महत्वाची! संजय राऊतांचे वक्तव्य )
पहिल्या मात्रेसाठी ९ लाख नागरीक प्रतीक्षेत!
परंतु ४५ वर्षांवरील वयोगटातील १९ लाख नागरिकांपैकी पहिल्या मात्रेसाठी ९ लाख नागरीक प्रतीक्षेत आहे. त्यातुलनेत ६० वर्षांवरील नागरीकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरीकांना पहिल्या मात्रेसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने प्रशासनाने आता या वयोगटातील व्यक्तींना सोमवार, मंगळवार, बुधवार या तिन्ही दिवशी लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या प्रभागाच्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर थेट लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहिल, असे स्पष्ट केले आहे. मात्र गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० टक्के लसीकरण हे कोविन अॅपवर नोंदणी व लसीकरण केंद्र व वेळ निश्चत झाल्यानंतरच केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही लसीकरण!
मुंबईतील रहिवासी असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजे परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हीसा, व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय २० किंवा डिएस १६० इत्यादी असल्यास त्यांना कस्तुरबा, राजावाडी, कुपर रुग्णालयात लसीकरण केंद्रावर जावून लसीचा लाभ घेता येणार आहे.
Join Our WhatsApp Community