सलग चौथ्या कासवाचा संपर्क तुटल्याने कासवप्रेमींमध्ये निराशा

129
ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठीला ट्रान्समीटर लावून सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून समुद्रातील भ्रमणमार्ग शोधण्याचा वनविभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गाशा गुंडाळत आहे. कर्नाटक राज्यात सर्वात पहिल्यांदा पोहोचलेली रेवा ही ऑलिव्ह रिडले कासवाकडून २२ जूनंतर कोणताच संपर्क झाला नसल्याची कबुली सोमवारी सायंकाळी कांदळवन कक्षाकडून दिली गेली.  एका महिन्याच्या आत तीन मादी ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटल्याने कासवप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला आहे. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर २ ऑगस्ट रोजी कांदळवन कक्षाने रेवाशी संपर्क तुटल्याचे जाहीर केले.
पाचपैकी चार ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटल्याने सुरुवातीपासून दक्षिण कोकणातील समुद्रात रमलेल्या वनश्री या ऑलिव्ह रिडले कासवावरच आता प्रकल्पाची मदार अवलंबून आहे. प्रथमा, लक्ष्मी, सावनी या तीन मादी ऑलिव्ह रिडले कासवांना भारतीय वन्यजीव संस्थेच्यावतीने सॅटलाईट टॅगिंग केले गेले. या तीन ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रकल्पाचा खर्च वनविभागाच्या कांदळवन कक्षाने उचलला. या तिन्ही मादी ऑलिव्ह रिडले कासव विणीच्या हंगामात जानेवारी महिन्यापासून राज्याच्या किनारपट्टीवर आले असता त्यांच्या पाठीवर सॅटलाईट टॅगिंग बसवले गेले. तिन्ही मादी ऑलिव्ह रिडले कासवांना नाव देत या प्रकल्पाबाबत उत्सूकता अजूनच वाढली गेली. त्यानंतर भारतीय वन्यजीव संस्थेने स्वतःच्या खर्चातून रेवा आणि वनश्री नाव दिलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग केले.

अन् प्रकल्पाला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली…

फेब्रुवारी महिन्यापासून कासवांचा संपर्क तुटण्यास सुरुवात झाली. लक्ष्मीचा सर्वात पहिल्यांदा संपर्क तुटला. मात्र महिन्याभराहून अधिक काळ प्रतीक्षा केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर सुरेशकुमार यांनी व्यक्त केली. मे महिन्यात प्रथमाशी संपर्क तुटल्यानंतर पाठीवर महिन्याभराच्या आतच सावनी आणि रेवाशीही संपर्क तुटला. शेवटपर्यंत तिन्ही ऑलिव्ह रिडले कासव कर्नाटक राज्यातील समुद्रातून सिग्नल देत होत्या.

ट्रान्समीटर गेले पाण्यात वाहून 

भारतीय वन्यजीव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार तिन्ही कासवांच्या पाठीवरील ट्रान्समीटर बुडाल्याचे कांदळवन फाऊंडेशनच्या सहसंचालक डॉ. मानस मांजरेकर यांनी सांगितले. वारंवार घडणा-या या घटनांबाबत आम्हाला भारतीय वन्यजीव संस्था ट्रान्समीटर निर्मिती करणा-या कंपनीकडून माहिती देऊन कळवणार असल्याचेही ते म्हणाले.

वनश्रीवरच सर्व काही अवलंबून

एका संपूर्ण विणीच्या हंगामातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या हालचालींची व समुद्रभ्रमंतीची माहिती मिळण्यासाठी आता केवळ वनश्री या मादी ऑलिव्ह रिडलेकडून अपेक्षा आहे. या हंगामात निदान तिच्यापाठीवर ट्रान्समीटरवरुन सिग्नल मिळू दे, अशी अपेक्षा भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर सुरेशकुमार यांनी व्यक्त केली. आपण ट्रान्समीटरची निर्मिती करणा-या न्यूझीलंडमधील कंपनीकडून ट्रान्समीटरच्या अकार्यक्षमतेबाबत या अगोदरच संपर्क केला असल्याची माहिती डॉ. सुरेशकुमार यांनी दिली. कंपनी याबाबतचा शोध घेत असल्याचेही ते म्हणाले.

नव्या विणीच्या हंगामात प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह 

डिसेंबर महिन्यापासून कासवांचा विणीचा हंगाम सुरु झाल्यानंतर कांदळवन कक्ष हा प्रकल्प पुन्हा नव्याने सुरु करेल का, याबाबतही आता चर्चा होऊ लागली आहे. अद्यापही या मुद्द्यावर चर्चा झालेली नाही, अशी माहिती डॉ. मांजरेकर यांनी दिली. वनश्रीकडून कितपत माहिती मिळतेय, त्याचा आढावा घेतल्यानंतर निर्णयाबाबत विचार करु, असेही ते म्हणाले.

चारही ऑलिव्ह रिडले कासवांच्या संपर्काची शेवटची तारीख 

  • लक्ष्मी – १ मार्च
  • प्रथमा – २४ मे
  • सावनी – ४ जून
  • रेवा – २२ जून
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.