थकीत पाणी बिलांवरील अतिरिक्त आकारावर तिसरी लाट संपुष्टात येईपर्यंत सूट!

प्रशासनाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात आला होता.

मुंबईत कोविडच्या प्रार्दुभावामुळे दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत असतानाच तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. परंतु या कोविड काळात अनेकांचे नोकरीधंदे, तसेच व्यवसायावर परिणाम झाला असून त्यामुळे त्यांच्यावर निर्माण झालेल्या आर्थिक संकटांमुळे अनेकांना नियोजित वेळेत पाण्याची देयके भरता आलेली नाही. त्यामुळे पाण्याची देयके भरण्यास विलंब झाल्यास त्यावर अतिरिक्त आकार आकारला जातो. त्यामुळे या अतिरिक्त आकाराचा अधिभार न लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने यापूर्वी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२१पर्यंत सवलत देण्यात आली होती. परंतु ही सवलत कोविडच्या पार्श्वभूमीवर तिसरी लाट संपुष्टात येईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका स्थायी समितीने घेतला आहे.

एकरकमी अभय याेजनेचा कालावधी वाढवण्याची मागणी

महापालिकेच्यावतीने जल देयके निहाय एकरकमी अभय याेजनेचा कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्याबाबत व थकीत जलदेयकांवर आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त आकाराची पुनर्रचना करून आलेला अधिभार या कालावधीत लागू न करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक चणचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता असून ही तिसरी लाट संपुष्टात येईपर्यंत या अभय योजनेचा लाभ थकीत जलदेयकांच्याबाबत ग्राहकांना देण्यात यावा, अशी मागणी उपसूचनेद्वारे केली आहे.

(हेही वाचा : आरोग्यमंत्र्यांनी बंद केली शिक्षणमंत्र्यांची ‘शाळा’)

सत्ताधारी शिवसेनेची अनुकूल भूमिका

यापूर्वी तीन महिन्यांचा कालावधी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या मागणीनंतर वाढवण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलेल्या मागणीनुसार प्रशासनाने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात आला होता. परंतु तीन महिन्यांची मुदतवाढ वारंवार वाढवून घेण्याऐवजी आता सत्ताधारी शिवसेनेने तिसरी लाट संपुष्टात येईपर्यंत अमर्याद कालावधीकरता ही सवलत देण्याची मागणी केली आहे. या मागणीनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here