बडतर्फ एसटी कर्मचारी लवकरच कामावर रुजू होतील, सदावर्तेंनी व्यक्त केला विश्वास

राज्यातील एसटी कर्मचा-यांनी केलेल्या आक्रमक संपाला आक्रमक वळण लाभल्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या सर्व कर्मचा-यांनी आझाद मैदानात मोठे आंदोलन छेडले. कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील या आंदोलनात उडी घेतली होती.

आक्रमक आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर काढलेल्या मोर्चामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लाभले. त्यामुळे सदावर्ते यांना अटक झाली होती तर 119 कर्मचारी आंदोलकांना बडतर्फ करण्यात आले होते. पण आता हेच बडतर्फ कर्मचारी लवकरच कामावर रुजू होतील, असा विश्वास सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे.

कर्मचारी बँड लावून कामाला जातील

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारमुळे माझे 100 पेक्षा जास्त कर्मचारी बांधव बडतर्फ होऊन घरी बसले आहेत. पण याच कर्मचा-यांच्या विश्वासामुळे शरद पवार यांचं सरकार कोसळलं. त्यामुळे आता हे 119 कर्मचारी बँड लावून कामावर रुजू होतील यात कुठलीही शंका नाही, असा ठाम विश्वास सदावर्ते यांनी दर्शवला आहे.

एसटी कर्मचा-यांना न्याय मिळेल

शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार एसटी कर्मचा-यांना योग्य तो न्याय देईल. राज्यातील कष्टकरी, शेतकरी यांच्या देखील मागण्या हे सरकार पूर्ण करेल. एसटी कर्मचा-यांसाठी आपण केलेली एसटी कष्टकरी जनसंघ संघटना ही केवळ संघटना नसून ती एक चळवळ आहे आणि चळवळ कायम राहत असते, तशीच ही सुद्धा सुरू राहील, असे गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here