मुंबईतील दगड विटांच्या राडा रोड्याची विल्हेवाट : पुढील २० वर्षांच्या प्रकल्पासाठी कंत्राटदारांची निवड

136

मागील पाच वर्षांत चार वेळा निविदा काढूनही रखडलेल्या मुंबईतील राडा रोड्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पाला अखेर अंतिम स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील पाच वर्षांत इमारत बांधकामासह रस्त्यांच्या कडेला पडलेल्या राडा रोड्याच्या विल्हेवाटीसाठी जागा उपलब्ध न होत असल्याने अखेर कंत्राटदारालाच जागेचा शोध करून त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी सोपवण्यात आल्याने अखेर २० वर्षांकरता नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या २०वर्षांकरता निवड केलेल्या दोन कामांसाठी सुमारे दोन हजार ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.

( हेही वाचा : मला जेलमध्ये टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंची मूकसंमती होती; देवेंद्र फडणवीसांचा आरोप )

मुंबईतील बांधकाम व पाडकाम कचरा संकलित करणे व वाहून नेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून निविदा मागवण्यात येत आहे. मुंबईतील किरकोळ घरदुरुस्ती मधून दैनंदिन निर्माण होणारा राडा रोडा अर्थात डेब्रीज निर्माण होता. हा राडा रोडा हटवण्यासाठी महापलिकेच्या माध्यमातून डेब्रीज ऑन कॉल सेवेमार्फत माफक दरात सशुल्क सेवा दिली आहे. या राडा रोड्यामुळे मुंबई अस्वच्छ करुन नागरिकांना त्रास निर्माण होत असल्याने सर्व प्रथम मुंबईतील १२०० मेट्रीक टन दगड विटांचा राडा रोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी मार्च २०१७ रोजी निविदा मागवल्या होत्या. परंतु याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुन्हा ८ ऑगस्ट २०१७ निविदा मागवल्या. अशाप्रकारे चार वेळा निविदा मागवल्या. या निविदा मागवताना महापालिका अशाप्रकारच्या डेब्रीजच्या विल्हेवाटीसाठी जागा उपलब्ध करून देणार होती, परंतु प्रत्यक्षात ही जागा उपलब्ध होत नसल्याने महापालिकेने आता नव्याने निविदा मागवून कंत्राटदाराच्या माध्यमातूनच जागा निर्माण करून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला.

या अंतर्गत महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये शहर व पूर्व उपनगरे साठी मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. तर पश्चिम उपनगरासाठी एजी एन्व्हायरो इन्फाप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची निवड झाली असून या दोन्ही गटांच्या प्रकल्प कामांसाठी १०३१.८९ कोटी रुपये तसेच १०२४.६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शहर आणि पूर्व उपनगरांसाठ मेट्रीक टनामागे १४२४ रुपये आणि पश्चिम उपनगराच्या डेब्रीजच्या मेट्रीक ट्रन १४१५ रुपये मोजले जणार आहेत. प्रत्येक वर्षी या मेट्रीक टनाच्या दरावर पाच टक्यांनी वाढ २० वर्षांमध्ये केली जाणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील डेब्रीज हे पात्र कंत्राटदारांना दिले जाणार असून मेट्रीक टन मागे जे पैसे निश्चित केले आहे, ते दिले जाणार आहे. त्यामध्ये संबंधित कंपनी मुंबईतील डेब्रीज उचलून नेत त्यावर प्रक्रिया करेल आणि त्याचे वर्गीकरण करत त्यापासून पेव्हर ब्लॉक किंवा रस्ते दुभाजक तथा बसण्याची आसने बनवतील.

विशेष म्हणजे या निविदेसाठी तीन कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यातील दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट व टीपीएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी अपात्र ठरली. त्यामुळे दोन कंपन्यांमध्ये निविदा मागवून दोन्ही कंपन्यांनी संगनमत करून हे काम मिळवले आणि प्रशासनानेही या दोन्ही कंपन्यांना कामे दिल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.