मध्य रेल्वेच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेचे नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यावर मध्य रेल्वेचा प्रवास सुसाट होणार असल्याचे सांगण्यात आले, पण सोबतच मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या 34 फे-या वाढवण्यात आल्या. या फे-या वाढल्याने मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. या बदल करण्यात आलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सीएसएमटी, ठाणे आणि कल्याण या गर्दीच्या ठिकाणांहून या वातानुकूलीत लोकलच्या फे-या असल्याने, सामान्य प्रवाशांची मात्र गर्दी वाढत आहे आणि त्यांना गर्दीतून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
प्रवाशांचा उडतोय गोंधळ
या वातानुकूलीत लोकल फे-या 19 फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत आल्या. त्याला अद्यापही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी सीएसएमटी ते कल्याण मार्गावर १० वातानुकूलित लोकल फेऱ्या होत्या. नव्या ३४ फेऱ्यांची भर पडणार असल्याने, या मार्गावरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ४४ झाली. सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव मार्गावरही १६ वातानुकूलित फेऱ्या होत आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा मार्गावर सेवेत आलेल्या ३४ नवीन वातानुकूलित फेऱ्यांसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्यांमध्येच बदल केले. याची प्रवाशांनाही कल्पना नसल्याने लोकल पकडताना त्यांचा गोंधळ होत आहे. सीएसएमटी, ठाणे, कल्याण येथून गर्दीच्या वेळी सुटणाऱ्या सामान्य लोकलऐवजी वातानुकूलित लोकल सुटत असल्याने, प्रवाशांना मिळेल त्या लोकलने गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.
( हेही वाचा: सर्वोत्तम कामगिरी करत, श्रेयस अय्यरने पटकावला ‘हा’ पुरस्कार )
मध्य रेल्वेने कल्पनाही दिली नाही
विनावातानुकूलित फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करताना, त्याची प्रवाशांना पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. प्रवाशांना हा बदल पचनी पडला आहे का, त्याचा मनस्ताप तर होत नाही ना? याचा आढावाही मध्य रेल्वे प्रशासन घेत नाही. वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी करूनही त्यांच्या वाढीव फेऱ्या चालवणे योग्य होते, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community