चैत्यभूमीवर खाद्यपदार्थांचे वाटप करायचे असेल, तर रविवारपर्यंत करा महापालिका आणि पोलिसांकडे नोंदणी

195

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र व इतर राज्यांतून येणा-या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. महापरिनिर्वाण दिनाला येणा-या अनुयायांना अनेक इच्छुक विविध सामाजिक संस्थांमार्फत खाद्य वितरण करण्यात येते. त्यामुळे संबंधित संघटन, संस्था तथा व्यक्तींनी महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग (सहायक अभियंता परिरक्षण) व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पोलिस ठाणे (मुंबई) यांना ४ डिसेंबर २०२२ पूर्वी लेखी स्वरुपात अवगत करावे,असे आवाहन जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२२ रोजी चैत्यभूमी आणि दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) महाराष्ट्र व इतर राज्यांतून येणा-या अनुयायांसाठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राचार्य एम. एम. पिंगे चौक, राजाबढे चौक लगत, ट्रॉफिमा हॉटेलच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराज मैदान, एस. एच. परळकर मार्ग (विष्णू निवासजवळ) आणि पद्माबाई ठक्कर, वेस्ट साईडच्या मागे अनुयायांना खाद्यपदार्थ वितरण केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक संघटना, संस्था व व्यक्तींनी महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग (सहायक अभियंता परिरक्षण) व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, पोलिस ठाणे (मुंबई) यांना ४ डिसेंबर २०२२ पूर्वी लेखी स्वरुपात अवगत करावे. जेणेकरुन सदर कामादरम्यान अन्न सुनियंत्रित पद्धतीने वितरण करणे, वितरणाकरीता येणा-या वाहनांचे नियंत्रण करणे, तसेच सुयोग्यप्रकारे कचरा संकलन करणे इत्यादी बाबींचे उचितप्रकारे नियोजन करणे व त्यानुसार अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी आवाहन केले आहे.

महापालिकेच्यावतीने सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्‍यभूमी येथे करण्‍यात येते. यावर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सोमवार ५ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

महापालिका आयुक्तांचे आंबेडकर अनुयायांना आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. अनुयायांनी या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस दल इत्यादींद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.