मुंबई महापालिकेच्यामाध्यमातून भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा मोहीमेतंर्गत ३५ लाख राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारपर्यंत मुंबईकरांना ३५ लाख राष्ट्रध्वजांचे वाटप करण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे असून या ध्वजांची मागणी वाढल्याने आणखी ५ लाख राष्ट्रध्वजांची खरेदी केली जात. त्यामुळे या अतिरिक्त पाच लाख ध्वजांचे वाटपही शुक्रवारपर्यंत पूर्ण केले जाईल,असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
( हेही वाचा : राज्यात NDRF आणि SDRF च्या १८ तुकड्या तैनात )
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे मोलाचे योगदान पाहता,मुंबई महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीही केली जात आहे.
घरोघरी तिरंगा ध्वज लावला जावा म्हणून महापालिकेच्या माध्यमातून ३५ लाख राष्ट्रध्वज खरेदीचा निर्णय घेतला. यातील पहिल्या टप्प्यातील ३५ लाख राष्ट्रध्वजांच्या खरेदीची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर आता आणखी ५ लाख ध्वज खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत खरेदी केलेल्या ३५ लाख राष्ट्रध्वजांपैंकी सर्व ध्वजांचे वाटप मुंबईकरांना करण्यात आले आहे. यातील जे काही दीड लाख ध्वज सदोष आढळून आले होते, तेही संबंधित संस्थेकडून बदलून घेत त्यांचेही वाटप करण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत वाटप केलेल्या ध्वजांनंतरही अधिक ध्वजांची मागणी लक्षात घेता अजून पाच लाख ध्वज खरेदी करण्यात येत आहे. हे पाच लाख ध्वजही शुक्रवार सकाळपर्यंत प्राप्त होणार असून त्यानंतर दिवसभरात प्रत्येक विभाग कार्यालयाच्या माध्यमातून वाटप केले जाईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काठ्यांना पर्याय प्लास्टिक पाईपचा
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ध्वजांचे मोफत वाटप करण्यात येत असले तरी यासाठी काठी उपलब्ध करून दिली जात नाही. परंतु यासाठी लागणारी लाकडी काठी उपलब्ध होत नसल्याने आता जनतेने हार्डवेअरच्या दुकानात धाव घेत प्लास्टिकचे पाईप खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ध्वजांसाठी आता प्लास्टिक पाईप अगदी कमी किंमतीत परवडणाऱ्या दरात मिळत असल्याने नागरिकांकडून लाकडी काठी ऐवजी प्लास्टीक पाईपचा वापर केला जात आहे. नागरिकांकडून काठीची मागणी होत असली तरी हा ध्वज काठी नसेल तर तो फडकवण्यासाठी भिंतीला आणि ग्रीलला चिकटवून प्रदर्शित केला जावू शकतो. यासाठी काठीची गरज नाही,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुढे ध्वजांचे काय कराल
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. यासाठी घरोघरी ध्वज लावले जाणार असले तरी १५ ऑगस्टनंतर महापालिकेने दिलेले किंवा खरेदी केलेले राष्ट्रध्वज पुन्हा कपाटमध्ये घडी करून ठेवायचा आहे. या अभियानंतर राष्ट्रध्वज कुठेही अन्य ठिकाणी फेकला जाणार नाही याची काळजी घेणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून अभियानानंतर ध्वज सुरक्षितठिकाणी ठेवला जावा,असे आवाहनही महापालिकेच्यावतीने केले जात आहे.
Join Our WhatsApp Community