स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे २०२१ या दिवशी १३८वी जयंती आहे. या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचा स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार कर्नल संतोष बाबू (मरणोत्तर) यांना दिला जाणार आहे. तर समाजसेवा पुरस्कार हा पुणेस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती या संस्थेला देण्यात येणार आहे.
शौर्य पुरस्काराची १९८९ पासून सुरुवात!
स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराची सुरुवात १९८९ सालापासून झाली. यात पहिला पुरस्कार परमवीर चक्र विजेते नायब सुभेदार बाणासिंह यांना देण्यात आला. आतापर्यंत २५ वीरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडून देणारे वीर तुकाराम ओंबळे यांचा देखील समावेश आहे.
(हेही वाचा : इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर)
१९९०पासून समाजसेवा पुरस्काराची सुरुवात!
याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्काराची सुरुवात १९९० पासून करण्यात आली आहे. याअंतर्गत समाज आणि मानव सेवा करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. पहिला पुरस्कार १९९० साली श्री गोविंद दत्तात्रेय हर्ष यांना देण्यात आला होता. त्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, लेफ्ट. कर्नल डॉ. एस.पी. ज्योती आणि सुनील देवधर अशा १५ प्रभूतींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रम ऑनलाईन होणार!
यंदा कोरोना महामारीमुळे कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करुन, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार या संपूर्ण सोहळ्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या फेसबूक पेज वरुन हा कार्यक्रम पाहता येणार आहे. अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community