दिवाळीत फटाक्यांच्या धुमधडाक्यात एक ते पाच नोव्हेंबरपर्यंत आगी लागण्याच्या १४१ घटना मुंबईत घडल्या आहेत. त्यापैकी ५८ आगी फटाक्यांमुळे लागल्या आहेत. मागील दोन वर्षांत अनुक्रमे ४७ आणि ३५ आगी या केवळ फटाक्यांमुळे लागल्या होत्या. मागील वर्षी कोरोनामुळे फटाके वाजवण्यावर बंदी होती. त्यामुळे फटाक्यांमुळे आगी लागण्याचे प्रमाण कमी होते, पण यंदा हे प्रमाण २०१९ च्या तुलनेत अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दिवाळीचे ५ दिवस धुमधडाका
यावर्षी कोरोना नियंत्रणात असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परिणामी यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत आहे. सर्व निर्बंध शिथिल झाल्याने यंदा मोकळेपणाने मुंबईकर दिवाळी साजरी करत आहेत. त्यामुळे यंदा फटक्यांची आतषबाजी जरा जोरातच होत असून मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे कानठळ्या बसत आहेत. मुंबईत भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या भाऊबीजेच्या दिवशीही फटाक्यांचा जोर असतो. त्यानुसार शनिवारी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.
फटाक्यांमुळे ५८ ठिकाणी आग
यंदा १ ते ५ नोव्हेंबर या पाच दिवसांत आगीचे १४१ वर्दी मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आल्या. त्यापैकी फटाक्यांमुळे आग लागण्याचे ५८ कॉल्स आहेत. अंधेरी मरोळ येथे शुक्रवारी एका लाकडाच्या वाखारीत फटाका पडून आग लागली होती. लेव्हल दोनची ही आग होती. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने ही आग नियंत्रणात आली. यंदा दिवाळीतील आगीत कुणीही जखमी झाल्याची नोंद नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली आहे.
(हेही वाचा : राष्ट्रवादीने सुनील पाटीलशी संबंध गुमान कबुल करावेत, अन्यथा…)
तीन वर्षांतील आकडेवारी
- १ ते ५ नोव्हेंबर २०२१ : ५८
- १२ ते १७ नोव्हेंबर २०२० : ३५
- २५ ते ३० ऑक्टोबर २०१९ : ४७
यंदाच्या वर्षी दिवाळीत लागलेल्या आगी
- १ नोव्हेंबर : १
- २ नोव्हेंबर : १
- ३ नोव्हेंबर : ४
- ४ नोव्हेंबर : ३३
- ५ नोव्हेंबर : १९