दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठ्या गर्दीने फुलल्या

120

येत्या शनिवारपासून दीपावलीला सुरुवात होत असून दीपावली पूर्वीच्या शेवटच्या शनिवारी खरेदीसाठी एकच झुंबड दादरसह मुंबईतील अनेक भागांमध्ये पहायला मिळत आहे. दीपावलीच्या खरेदीची लगबग आता घरोघरी सुरु झाली आहे. कपड्यांसह आकाश कंदिल, रांगोळी, पणत्यांसह इतर घर सजावटीच्या सामानांच्या खरेदीसाठी मुंबईकर घराबाहेर पडले होते. त्यामुळे अनेक बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे दिसत होते.

येत्या शनिवारी धनत्रयोदशीपासून दीपावलीला सुरुवात होत असून बुधवारी दीपावली पाडवा, भाऊबीज आहे. दीपावलीच्या सणाकरता मुंबईकरांची आता खरेदीसाठी लगबग सुरु झाल्याने शनिवारी सुट्टीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. दीपावलीच्या सणाकरता आकर्षक कपड्यांसह आकाश कंदिल, रांगोळी, पणत्या, विद्युत दिवे तसेच सजावटींच्या साहित्यांनीही बाजार फुलून गेला आहे. रस्त्यांवरील पदपथांसह अनेक दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारी गर्दी दिसून येत होती. दादरमधील रानडे मार्ग, डिसिल्व्हा रोड, जावळे मार्ग आदींसह बोरीवलीसह काँफ्रर्ड मार्केट,घाटकोपर,वांद्रे लिंकींग रोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी जनतेची गर्दी दिसून येत होती.

New Project 2022 10 15T180342.288

दादर रानडे मार्गावरील रंगीबेरंगी पणत्या विक्रीचे अनेक स्टॉल्स असून या पणत्यांची विक्री करणाऱ्या प्रसाद टोणपे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना आपल्याकडे ५० ते ६० प्रकारच्या पणत्यांचे प्रकार विक्रीला असून ४० ते ४०० रुपयांपर्यंत पणत्या विक्रीला असल्याचे सांगितले.

( हेही वाचा: उद्धव गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर नाराज? )

तर कंदिलचा व्यवसाय करणारे दादरमधील प्रशांत पवार सांगतात की कोविडनंतरची जनतेची पहिली दिवाळी असल्याने यंदा अनेक प्रकारचे कंदिल विक्रीला ठेवले आहेत. कंदिल खरेदीला प्रतिसाद मिळत असून आपल्याकडे ३०० ते ५५० रुपयांपर्यंतचे कंदिल उपलब्ध असल्याचे सांगितले. तर आकर्षक विद्युत दिव्यांची विक्री करणारे चंद्रवली सांगतात पावसाने काहीसा धंद्यावर परिणाम झाला. परंतु शनिवार असल्याने काही प्रमाणात लोक रस्त्यांवर दिसू लागले आहेत. विद्युत दिव्यांच्या खरेदीकडे चांगल्याप्रकारे ग्राहकांचा कल असून १५० ते ५०० रुपयांपर्यंतचे विद्युत दिव्यांच्या माळा आपल्याकडे विक्रीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपावली असल्याने नवीन कपडे खरेदीसाठीही कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत होती. लहान मुलांच्या कपड्यांसह मोठ्यांच्या पसंतीचे कपडे खरेदीची लगबग दुकानांसह पदपथांवरील कपड्यांच्या स्टॉल्सवर दिसून येत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.