सध्या कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत कमी असली तरी गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या पाहून केंद्र सरकाने सर्व आरोग्य यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात केलेल्या सिरो सर्वेक्षणाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या दोन दिवसात हा अहवाल येणार असून, त्यानंतर मुंबईकरांच्या शरीरात कोरोना विरोधातील प्रतिपिंडे आहेत की नाहीत याचा उलगडा होणार आहे.
कोरोनाची महामारी जोमात असताना, महापालिकेने सिरो सर्वेक्षण चालूच ठेवले होते. विशेष म्हणजे कोरोना विरोधातील लसीचे दोन डोस मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहेत. तसेच, काही प्रमाणात नागरिकांनी बूस्टर डोसही घेतला आहे. त्यामुळे या लसीकरणामुळे या आजाराच्या विरोधात लढण्याची प्रतिपिंडे असण्याची शक्यता आहे. या प्रतिपिंडांमुळे आजाराचा फारसा त्रास नागरिकांना जाणवत नाही.
( हेही वाचा: १० वी उत्तीर्णांना टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! ४०५ रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज )
सिरो सर्वेक्षण म्हणजे काय?
- कोरोना विषाणूच्या विरोधातील किती लोकांमध्ये प्रतिपिंडे तयार झाली हे या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. ज्या व्यक्तींच्या शरीरात प्रतिपिंडे आढळतात या अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. तसेच, या व्यक्तीमध्ये संसर्ग पसरवण्याचे प्रमाण कमी असते.
- साथीच्या आजाराच्या काळात गेल्या दोन वर्षात आरोग्य यंत्रणेने अशा पद्धतीने सिरो सर्वेक्षणाचे आयोजन केले होते. स्थानिक पातळीवर महानगरपालिका, राज्य पातळीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, तर देश पातळीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अशा पद्धतीचे सर्वेक्षण करत असतात. यामुळे या आजाराच्या विरोधात लढण्याचे सर्वेक्षण करत असतात. यामुळे या आजाराच्या विरोधात लढण्याची प्रतिपिंडे शरीरात आहेत की नाहीत याची माहिती कळते.