मुंबईचे नाशिक करायचे आहे का? भाई जगताप यांना आयुक्तांनी सुनावले 

मुंबई महापालिकेत मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली, तेव्हा कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहून आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी भाई जगताप यांना चांगलेच सुनावले.

एकमेकांना खेटून बसले कार्यकर्ते! 

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मुंबई महापालिकेत ऊठबस वाढू लागली आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी, १५ मार्च रोजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, पक्षाचे नेते चरणसिंह सप्रा, विरोधी पक्ष नेता रवी राजा आणि पक्षाचे काही पदाधिकारी भेटण्यासाठी आले होते. दुपारी एक वाजता ही भेटीची वेळ ठरली होती आणि महापालिका आयुक्तदेखील अगदी वेळेत भेट देण्यासाठी उपलब्ध झाले. आयुक्तांच्या दालनात शेजारच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होती. बैठकीसाठी या कॉन्फरन्स हॉलमध्ये महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल प्रवेश करताच चक्क भाई जगताप यांच्यावर भडकले. कारण आलेले सर्व पदाधिकारी आणि नेते एकमेकांना खेटून खुर्च्यांवर बसलेले होते. आयुक्तांनी सर्वांना एक खुर्ची सोडून बसायला सांगितले.

(हेही वाचा : राज्यात कोरोनाचे नवे निर्बंध! जाणून घ्या!)

सामाजिक अंतर ठेवा! 

हे करत असताना आयुक्तांनी भाई जगताप यांनाही सामाजिक अंतर बाळगण्याचे महत्त्व समजावून सांगितले. असेच वागत राहिलात, तर मुंबईचे नाशिक व्हायला वेळ लागणार नाही, असेही सुनावले. सध्या नाशिकमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून ही वाढ तीन हजाराच्या घरात गेलेली आहे. त्यामुळे आयुक्तांनी मुंबईचे नाशिक करायचे आहे का? असा सवाल भाई जगताप यांना विचारला आणि तातडीने सर्व पदाधिकाऱ्यांना एक खुर्ची सोडून बसायला सांगितले. सध्या आपली परिस्थिती बरी असली तरीही रुग्ण झपाट्याने वाढत असल्याची जाणीव ठेवा, असेही आयुक्तांनी भाई जगताप यांना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here