कोरोना रुग्णांना २४ तासांत बरे करण्याचा दावा करणाऱ्या वांगणीच्या डॉ. उमाशंकर गुप्तासह दोघांवर कुळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता याच्यासह त्याच्या सोबत एक महिला डॉक्टर काम करत होती. त्या महिला डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता याला कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्याची परवानगी नसतानाही तो कोरोना रुग्णांवर उपचार करायचा आणि त्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमावली धाब्यावर बसवून उपचार करायचा, त्याविरोधात दोनच दिवसांपूर्वी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने सर्वप्रथम वृत्त दाखवले होते, त्या वृत्ताचा परिणाम म्हणून डॉ. गुप्ताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘शीला क्लिनिक’ नावाने थाटलेला दवाखाना!
बदलापूर वांगणी येथे डॉ. उमाशंकर फागुराम गुप्ता आणि महिमा गुप्ता या दाम्पत्याने ‘शीला क्लिनिक’ नावाने दवाखाना थाटलेला आहे. त्याच्याकडे कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची कुठलीही परवानगी नाही. तरीदेखील ते कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करून २४ तासांत या रुग्णांना कोरोना मुक्त करीत असल्याचा दावा डॉ. उमाशंकर गुप्ता करत होता. हे उपचार करत असताना डॉ. गुप्ता कोरोनात घेण्यात येणारी काळजी न घेता अथवा शासनाने लागू केलेल्या नियमांची पायमल्ली करत होता, तसा व्हिडिओ ‘हिंदुस्थान पोस्ट’ने सर्वात आधी व्हायरल केला होता.
(हेही वाचा : या अफवेखोर डॉक्टरवर कारवाई कधी?)
काय दावा होता डॉ. गुप्ताचा?
या व्हिडिओत डॉ. गुप्ता याने कोरोनाचे रुग्ण २४ तासांत बरे करत असल्याचा दावा करून, ९९ टक्के फुफ्फुसाला इन्फेक्शन झालेले रुग्ण २४ तासांत बरे केल्याचा दावा डॉ. गुप्ता या व्हिडिओमध्ये करून नागरिकांची दिशाभूल करीत होता. याबाबतचे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने चालवून डॉ. गुप्ता कोरोना आणि लसीकरण याबाबत अफवा पसरवत असल्याचे दाखवण्यात आले होते. ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या व्हिडिओची दखल घेत अखेर कुळगाव पोलिसांनी ‘शीला क्लिनिक’चा डॉ. गुप्ता आणि त्याची सहकारी महिला डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून या डॉक्टरची पदवी तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community