संपकरी डॉक्टर थेट मुख्यमंत्र्यांना भेटले! बैठकीत काय ठरले?

मागील ३ दिवसांपासून 'मार्ड'च्या माध्यमातून निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत.

67

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. मागील ३ दिवसांपासून ‘मार्ड’च्या माध्यमातून निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे केले कौतुक!

कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाईल. तेव्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हेही उपस्थित होते.

(हेही वाचा : आर्यन खानच्या एनसीबीच्या कोठडीतील मुक्काम वाढला!)

काय होत्या डॉक्टरांच्या मागण्या?

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, महापालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे यासंदर्भात मार्डने संप पुकारला होता. शैक्षणिक शुल्क माफी तसेच जीएसटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच महापालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्वरित पाऊले उचलावी, असे सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय तसेच महापालिकेतील निवासी डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्धल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले. यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व राज्य शासन योग्य ती पाऊले उचलेल, असा विश्वास व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.