मुंबईतील डाॅक्टरांचा सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा

नायर, केईएम, सायन, कुपर या रुग्णालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टरांनी एकत्र येऊन प्रसिद्धी पत्रकाद्वारे संपाचा इशारा दिला आहे.

67

राज्य सरकारने मान्यता दिल्याप्रमाणे विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात यावी. तसेच ही वाढ सप्टेंबर २०२० पासून लागू करावी, अशी मागणी मुंबई मार्डने मुंबई महापालिकेकडे केली आहे. अन्यथा सर्व डॉक्टर सामूहिक रजेवर जातील, असा इशाराही मार्डने दिला आहे. महानगर पालिकेची प्रमुख रुग्णालयं असणाऱ्या नायर, केईएम, सायन, कुपर या रुग्णालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टरांनी एकत्र येऊन प्रसिद्धी पत्रकाद्वारे संपाचा इशारा दिला आहे.

विद्यावेतनात वाढ नाही

मुंबईच्या तत्कालीन आयुक्तांनी कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मानधन दरमहा देण्याचे जाहीर केले होते. हे मानधन विद्यार्थ्यांना दिले जात होते. दरम्यान राज्य सरकारने पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करत, विद्यावेतनात सप्टेंबर २०२० मध्ये दहा हजार रुपये वाढ केली. परंतु मुंबई महापालिकेने राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ लागू केली नाही.

(हेही वाचाः २१० एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर परिवहन मंत्री म्हणतात, आता लस द्या!  )

डॉक्टरांची फसवणूक केल्याचा आरोप

मार्डने वारंवार मागणी केल्यानंतर १२ मार्चला वेतनवाढीला मंजुरी देण्यात आली. परंतु ही वेतनवाढ सप्टेंबरपासून न देता १ मेपासून दिली असून, कोरोनाकाळात दिलेले वाढीव वेतन हेच विद्यावेतनवाढ आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, कोरोना काळात वर्षापेक्षाही अधिक काळ अखंड सेवा जीव धोक्यात घालून आम्ही देत आहोत. परंतु पालिकेने ऐनवेळी आपली भूमिका बदलून ३००० निवासी डॉक्टरांची फसवणूक केली आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

…तर आरोग्य यंत्रणेसमोर मोठे संकट

जून महिन्यापासून देण्यात आलेला कोविड भत्ता हा पगारवाढ समजून देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पण संबंधित कोविड भत्ता हा प्रोत्साहनपर असल्याचे डाॅक्टरांच्या संघटनेचा दावा आहे. तेव्हा शासनाने दिलेली वेतनवाढ सप्टेंबरपासून देण्याचा निर्णय सात दिवसांत न झाल्यास मुंबई महापलिकेच्या रुग्णालयातील सर्व डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार असल्याचे मार्डकडून सांगण्यात आले आहे. कोरोना काळात डाॅक्टर रजेवर गेल्यास मोठे संकट आरोग्य यंत्रणेसमोर उद्भवू शकते.

(हेही वाचाः …तर ठाकरे सरकार एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.