डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) येथील केमिकल कंपनीतील स्फोटात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच या स्फोटात जो कोणी दोषी आढळून येईल त्याच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पत्रकारांशी बोलताना दिले. डोंबिवली पूर्व एमआयडीसी फेज २ या ठिकाणी गुरुवारी (२३ मे) दुपारी अमुदान या केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून ढिगाऱ्याखाली १० ते १२ जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Dombivli MIDC Blast)
या स्फोटात आजूबाजूच्या कंपनीतील तसेच रहिवासी असे ६० जण किरकोळ जखमी झाले आहेत. अमुदान केमिकल कंपनीत ‘हार्डनर’ हे केमिकल तयार तयार होत होते. या कंपनीचे मालक घाटकोपर येथे राहणारे असून या कंपनीत जवळपास दोन शिफ्टमध्ये २० ते २५ कर्मचारी काम करीत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी करून एम्स रुगणाल्यात जखमींची भेट घेतली. (Dombivli MIDC Blast)
(हेही वाचा – Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील केमिकल कंपन्यांचे शहराबाहेर स्थलांतर; इंजिनिअरिंग कंपन्यांना प्राधान्य; कारण वाचा सविस्तर…)
या स्फोटात मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असून जखमींवर मोफत उपचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ, अग्निशमन दल, केडीएमसी आपत्कालीन विभागाचे कर्मचारी करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या स्फोटाची उच्चस्तरिय चौकशी करण्यासाठी कमिटी नेमण्यात येईल, तसेच यामध्ये इंडस्ट्रीयल सेफ्टी विभागाचा निष्काळजीपणा अथवा दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. (Dombivli MIDC Blast)
या स्फोटाप्रकरणी संबंधित व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच अती ज्वालाग्राही तसेच हानिकारक केमिकल कंपन्याचे गट तयार करून अतिधोकादायक केमिकल कंपन्यांना रेड (लाल) गटात टाकून त्यांना येथून स्थलांतर करण्यात येईल किंवा त्यांना त्याच ठिकाणी दुसरा व्यवसाय करण्याचा विकल्प दिला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. (Dombivli MIDC Blast)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community