डोंबिवलीतील सोनार पाडा एमआयडीसी येथे अंबर केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. गुरुवारी, (२३ मे) ही घटना घडली. या स्फोटामुळे कंपनीतील काही कर्मचारी होरपळून गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती दिली जात आहे. या स्फोटाची झळ आजूबाजूच्या इमारतींनाही पोहोचली आहे. कंपनीतील २० कर्मचारी होरपळून जखमी झाले आहेत. स्फोटानंतर धुराचे प्रचंड मोठे लोट परिसरात पसरले.
(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा विराट पहिला खेळाडू)
घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवताच ६ बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण कंपनीत अजूनही सातत्याने स्फोट होत असल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
स्फोटामुळे इमारतींच्या खिडकीच्या काचा फुटल्या
स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, या कंपनीच्या २ ते ३ किलोमीटरच्या परिघातील अनेक इमारतींच्या खिडकीच्या काचा फुटल्या. कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली. आग लवकर नियंत्रणात आली नाही, तर झळ आसपासच्या कंपन्यांनाही बसण्याची शक्यता आहे. अंबर केमिकल कंपनी रहिवासी परिसरात आहे. परिसरात अनेक इमारती आहेत. या इमारतींनाही झळ बसल्यामुळे प्रशासनाची काळजी वाढली आहे.
अग्निशमन दलापुढे आव्हान…
बॉयलरमधील केमिकलच्या स्फोटामुळे ही आग लागली. त्यामुळे आग विझवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या केमिकलचा मारा करावा लागतो. त्यामुळे आग विझवण्याचे आव्हान अग्निशमन दलापुढे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community