Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला ‘रेसिप्रोकल कर’ लादण्याचा इशारा

Donald Trump on India : भारताने अमेरिकन आयातीवरील कर कमी करावा अशी अमेरिकेची मागणी आहे. 

58
Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला ‘रेसिप्रोकल कर’ लादण्याचा इशारा
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आयात शुल्काच्या बाबतीत ‘जैसे थे’ उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. म्हणजे भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावरील आयात शुल्क कमी केलं नाही, तर भारतातून आयात होणाऱ्या मालावर अमेरिकाही अतिरिक्त शुल्क लावेल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यांनी आपल्या कारभाराची दिशा स्पष्ट करताना हे विधान केलं आहे. ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातही ही रणनीती वापरली होती आणि तिला ते ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ असं म्हणतात. (Donald Trump on India)

‘ते आमच्यावर कर लादतात. पण, आम्ही तेवढा कर लादत नाही. ते आमच्या सगळ्यांच वस्तूंवर कर लावतात. आता ते लावतात, म्हणून आम्हीही तेवढाच कर लावणार,’ असं विधान पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी केलं आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी असा इशारा भारताबरोबरच ब्राझील आणि कॅनडालाही दिला आहे. अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मोहिमेत ट्रम्प यांनी भारताबरोबरील आपली मैत्री अधोरेखित केली होती. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत त्यांची भेट घेण्यासाठीही गेले होते. (Donald Trump on India)

(हेही वाचा – Veer Savarkar : मनुस्मृतीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप अज्ञानाचे लक्षण)

‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा चांगला माणूस आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. भारताबरोबर माझे चांगले संबंध आहेत. पण, ते खूप जास्त कर लादतात आणि ते जितका कर लावतील, तितकाच अमेरिका त्यांच्यावर लावेल,’ असं ट्रम्प यांनी सुनावलं आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या पोलाद आणि ॲल्युमिनिअमवर अमेरिकन प्रशासनाने कर वाढवला होता. आताही तशीच परिस्थिती ओढवू शकते. (Donald Trump on India)

ट्रम्प प्रशासनाने अशा कराला ‘रेसिप्रोकल कर’ असं नाव दिलं आहे. म्हणजे इतर देश आपल्या अमेरिकन आयातीवर जो कर लावतात, तितकाच कर अमेरिका त्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावणार, असं हे धोरण आहे. या धोरणामुळे आधीसारखाच भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार संबंधांमध्ये काही काळ तणाव येऊ शकतो. पण, काही जाणकारांच्या मते सध्या अमेरिकेचं लक्ष चीनवर असल्याचा फायदा भारताला मिळू शकतो. अमेरिकन प्रशासन चीनकडून आयात होणाऱ्या मालावर अतिरिक्त कर लावण्याच्या विचाराधीन आहे. त्यामुळे भारताला वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान अशा क्षेत्रात निर्यातीच्या संधी निर्माण होतील, असं काहींना वाटतं. (Donald Trump on India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.