मुंबई टप्पा १० अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांचे बांधकाम निकृष्ट असल्याचे बोलले जात असतानाच आता टप्पा ११ अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांचे बांधकामही निकृष्टच असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी बांधलेल्या शौचालयांची पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आली असून २२ हजार शौचकुपांचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली असली, तरी यातील केवळ ५७ टक्के शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. तसेच, काम पूर्ण होऊनही त्यांचे हस्तांतरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आम्हाला नवीन शौचालये नको किमान त्यांची मलकुंडेच साफ करून द्या, अशी आर्जवी आता नगरसेवकांकडून केली जात आहे.
कामे परस्पर रद्द करण्याचा प्रयत्न
भांडुप, कांजूर मार्ग व विक्रोळी या एस विभागांमध्ये सार्वजनिक शौचालये उभारण्याचा प्रस्ताव आला असता, भाजपच्या कमलेश यादव यांनी ६० कोटी रुपयांच्या या प्रस्तावांमध्ये कुठल्या जागेत शौचालये उभारली जाणार आहेत, याची माहिती दिलेली नाही. आतापर्यंत ज्या भागांमध्ये शौचालये बांधण्याचे कंत्राट दिले आहे, तिथे जागेची एनओसी नाही, तर कुठे लोकांनी विरोध केल्याने शौचालय उभारणीची कामे पूर्ण झालेली नाहीत. यावर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीने मंजूर केलेल्या शौचालयांची कामे परस्पर रद्द करण्याचा प्रयत्न उपायुक्त (घनकचरा) यांच्याकडून सुरु असल्याचा आरोप केला. टप्पा ११ अंतर्गत जी शौचालये बांधायची होती, त्यातील ५७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. स्थायी समितीचा निर्णय उपायुक्त कसे बदलू शकतात, असा सवाल करत जाणूनबुजून सत्ताधारी पक्षाची सत्ता कशी जाईल, याचाच विचार काही अधिकारी करत असल्याचे राजा यांनी सांगून आयुक्तांकडे बोट दाखवले.
(हेही वाचा महापौरांमुळे गरीब रुग्ण औषधांपासून वंचित! वर्षभर लटकली औषध खरेदी)
जुन्या शौचालयांची मलकुंडेच साफ करून द्या
मुंबईत जरी काही कारणांमुळे शौचालयांची उभारणी करण्यात अडचणी येत आहे. त्याचा जरी बारकाईने अभ्यास केल्यास तसेच पाहणी केल्यास ८० टक्के शौचालयांची उभारणी करता येऊ शकते, असे सपाचे गटनेते रईस शेख यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या नगरसेविका व आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी एक ते तीन मजली शौचालये उभारण्यापेक्षा आधी जुन्या शौचालयांची मलकुंडेच साफ करून द्यावी, तसेच जी तळमजल्याची शौचालये आहेत. त्यावरच साध्या प्रकारे बांधकाम केले जावे, अशी सूचना केली.
शौचालयांवर सर्व्हिस सेंटर बांधली
भांडुप भागामध्ये एस विभाग कार्यालयापासून काही अंतराच्या हाकेवर दोन गल्ल्यांमधून मलवाहिनीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे एस विभागातील शौचालयांचा हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्याची मागणी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केली. या भागांत ९४ शौचालये बांधण्याचा हा प्रस्ताव असून त्यातील ९ शौचालये तोडले आहेत आणि ४३ पुन्हा बांधली जाणार आहेत. परंतु यापूर्वी अशा प्रकारची कंत्राटे दिली होती, त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. तर काही ठिकाणी शौचालयांवर सर्व्हिस सेंटर बांधली गेली आहेत. त्यामुळे हा प्रस्तावच फेरविचारासाठी पाठवला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा : सत्ताधारी शिवसेनेला हुतात्मा स्मारकाच्या नामकरणाचा विसर! )
चौकशी करावी
पैसे द्या व वापरा या तत्वावर जी शौचालये बांधली आहेत, त्याची चौकशी केली जावीत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी देत एकेका संस्थेने २० ते ३० शौचालयांची कामे मिळवल्याचे सांगितले. लोकांकडून पैसे घेतले जातात, पण तिथे साफसफाईच होत नाही. काहींनी शौचालयांवर अनधिकृत बांधकामे केली आहेत. काही जणांनी शौचालयांवरील जागा भाड्याने दिली आहे. कुणी मोबाईल टॉवर बसवून त्यावरील भाडे स्वत:च उकळत आहेत. त्यामुळे याची चौकशी करावी, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community