रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको; CM Eknath Shinde यांची अधिकाऱ्यांना तंबी

93
उद्धव ठाकरेंनी राज यांना बाजूला केले; CM Eknath Shinde यांचा खळबळजनक दावा

ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना वाहतुक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नाशिक-भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरूस्तीच्या कामात हयगय करू नका, अशी तंबी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली. पीक अवरमध्ये अवजड वाहतुकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी. तसेच अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्कींग लॉट करावे, असे निर्देशही शिंदे यांनी बैठकीत दिले.

ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीचे नियोजन याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी त्यांनी ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातून होणाऱ्या अवजड वाहतुकीचे नियमन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. नाशिक-भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून ते चांगल्या दर्जाचे आणि जलद गतीने करावे, असे शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Pune Metro : स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मिळणार गती)

बैठकीत शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाणे ते नाशिक, ठाणे ते अहमदाबाद या महामार्गावरील खड्ड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासातून तात्काळ दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी दिवसरात्र एक करून खड्डे बुजवावेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तात्काळ खड्डे बुजविल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल. ज्या ठिकाणी खड्डे भरायला कालावधी आवश्यक असतो तेथे प्रीकास्ट पॅनलचा वापर करावा. राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. यंत्रणांनी समन्वयातून काम करावीत. दुरुस्तीच्या कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामार्ग दुरूस्ती कामाची शुक्रवारी पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एकीकडे खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू असताना वाहतूक नियमनासाठी ट्रॅफीक वॉर्डनची संख्या वाढविण्याचे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले. जेएनपीटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडू नये यासाठी या अवजड वाहतुकीचे नियमन करण्यासाठी जेएनपीटीमधून अवजड वाहनांचे नियंत्रण करण्यात यावे. जेएनपीटीकडून पनवेल, पुणे, ठाण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे देखील तातडीने बुजविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) दिले. नवी मुंबई, पनवेल, जेएनपीटी भागातून येणाऱ्या वाहतुकीच्या नियमनासाठी सिडकोने नवी मुंबई पोलिसांना २०० ट्रॅफीक वॉर्डन उपलब्ध करून द्यावेत. तसेच अवजड वाहनांसाठी आवश्यक तेवढ्या क्रेन जेएनपीटीने उपलब्ध करून देण्याची सूचना शिंदे यांनी केली.

(हेही वाचा – RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय)

अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी नाशिक महामार्गावर सोनाळे, पडघा, आसनगाव याठिकाणी पार्किंग लॉट तयार करा. सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा यावेळेत अवजड वाहतूक बंद करण्याबाबत एकत्रित अधिसूचना कोकण विभागीय आयुक्तांनी काढावी. खड्डे भरणे, नाल्यांची दुरुस्ती करणे आदीसह आवश्यक दुरुस्त्या करण्यात याव्यात आणि या कामाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्यात यावा, अशा सूचना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त पी. वेलरासु, जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे, नाशिक, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, वाहतूक पोलिस अधिकारी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.