Dress Code : मंदिरातील वस्त्रसंहितेविषयी खोटा प्रचार करू नका; वस्त्रसंहिता महिलांसाठी नव्हे, तर सर्वांसाठीच; हिंदू जनजागृती समितीचा इशारा

42

मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात वस्त्रसंहिता (Dress Code) लागू करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्याचे महाराष्ट्रातील समस्त मंदिरांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा जाहीर करतो. तसेच मंदिरातील ही वस्त्रसंहिता केवळ महिलांना लागू करण्यात आलेली नसून ती सर्वांसाठीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी ‘महिलांवर अन्याय’ या स्वरूपाची महिला आयोगाकडे केलेली तक्रार हा खोटा प्रचार आहे. तसेच झेन सदावर्ते यांचे आई-वडिल हे अधिवक्ता असून त्यांना न्यायालयातील इंग्रजाळलेला वकीली ड्रेसकोड अर्थात काळा वकीली पेहराव घालण्याची सक्ती चालत असेल, तर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेवरच आक्षेप का? काळ्या वकीली पेहराव घालण्याची सक्ती उठवा, अशी मागणी वा तक्रार सदावर्ते यांनी न्यायालयात कधी केली आहे का, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या प्रतिक्षा कोरगांवकर यांनी केला आहे.

(हेही वाचा MMRDA साठी एकच परिवहन सेवा करण्याचा अभ्यास सुरु; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती देणार अहवाल)

मंदिर हे धार्मिकस्थळ

केवळ मंदिरेच नव्हे, तर देशभरातील अनेक मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी अनेक धार्मिक स्थळांमध्ये वस्त्रसंहिता (Dress Code) लागू करण्यात आलेली आहे. न्यायालय, पोलीस, रुग्णालय, शाळा, शासकीय कार्यालये या सर्वच ठिकाणी वस्त्रसंहिता अनेक वर्षे लागू आहे. त्यामुळे केवळ हिंदूंच्या मंदिरामध्ये महिलांवर बंधने आणली जात आहे, हा आक्षेप चुकीचा आहे. हवाई सुंदरींना कमी कपडे घालून अंगप्रदर्शन करण्यास भाग पाडले जाते, याविषयी कोणाला आक्षेप वाटत नाही वा कोणी तक्रार करत नाही; मात्र मंदिरात संस्कृती पालनासाठी सर्वांसाठी केलेल्या नियमांवर आक्षेप घेतला जाणे निंदनीय आहे. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथील भावभक्तीमय वातावरण आणि पावित्र्य यांना समोर ठेवूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. त्यामुळे मंदिरामध्ये भाविकांनी येतांना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन जर मंदिर प्रशासन करते, त्यात चुकीचे काहीच नाही. वस्रसंहिता (Dress Code) मंदिरांप्रमाणेच चर्चमध्ये आणि मशिदींमध्येही लागू आहेच; मग कधी या विरोधात सदावर्ते यांनी आवाज उठवला आहे का? मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली, असेही प्रतिक्षा यांनी म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.