काळजी नको ! संचारबंदी असली तरीही लसीकरण सुरूच राहणार!

केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर ही लसीकरण केंद्रे सुरू असणार.

मुंबईत कोविड-१९ लसीकरण मोहीम अंतर्गत शनिवार, १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ आणि रविवार, ११ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु ठेवण्यात आले आहे. परंतु, मुंबईतील खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०, ११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. असे असले तरी, लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापलिका सार्वजनिक आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. या लसीकरणासाठी लोकांना बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदी आहे म्हणून लसीकरणाला जाण्याचे टाळू नका. पोलीस तुम्हाला हटकणार नाही.

लससाठा उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु

मुंबईत महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून संपूर्ण मुंबईत प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. परंतु कोविड-१९ लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०, ११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही. महानगरपालिकेला ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा मिळणार आहे. अधिक प्रमाणात लससाठा उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

( हेही वाचा : लसीकरण : महाराष्ट्राची हेळसांड! )

या केंद्रांवर लसीकरण सुरू असणार

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन संचालित लसीकरण केंद्रांमध्ये शनिवार, १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पहिले सत्र राहणार आहे. ज्या केंद्रांमध्ये नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असेल अशा लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री ८ वाजेपर्यंत कार्यान्वित राहिल. यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील.

महापलिका आणि शासकीय लसीकरण केंद्र

  • शनिवार, १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पहिले सत्र
  • रविवार, ११ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण
  • खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात १०, ११ आणि १२ एप्रिल २०२१ या तीन दिवशी लसीकरण होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here