सोमवार, १७ मे रोजी सकाळीच तौक्ते या चक्रीवादळाने मुंबईच्या वेशीवर हजेरी लावली. दिवसभर हे वादळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत राहणार आहे, संध्याकाळी हे वादळ पुढे गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे. हवामान खात्याने पुढील ४-५ तास मुंबईसाठी चिंतेचे असतील असे म्हटले आहे, कारण मुंबईच्या समुद्रकिनारी ताशी १५०-१८० किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. असा परिस्थिती मात्र मुंबईतील कुलाबा भागातील रडारमध्ये बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे, त्याच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे समजते.
याबाबत ‘हिंदुस्थान पोस्ट’ने मुंबई हवामान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा दिला, मात्र यावर अधिक बोलण्यास नकार दिला. हे वादळ अतिशय तीव्र स्वरूपाचे असणार आहे. या वादळात वाऱ्याचा वेग हा ताशी १५० ते १८० प्रति तास वाहण्याची शक्यता आहे, संध्याकाळी ७ वाजता हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकणार आहे, असे डॉ. सरकार म्हणाले.
IMD Mumbai radar not working properly since yesterday. Not for the first time this happening during major event.
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) May 17, 2021
रडारच्या दुरुस्ती आव्हानात्मक!
याविषयी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर म्हणाले, असा प्रकारे रडारमध्ये बिघाड होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण शेवटी तेही एक यंत्रच असते. मात्र डॉप्लर रडार हे काही छोट्या आकाराचे नसते, प्रचंड अवाढव्य असते. त्यामुळे त्याची दुरुस्ती करणेही तितकेच आव्हानात्मक असते. विशेष म्हणजे या रडारचे पार्ट साधारण बाजारात मिळत नाहीत, ते त्या त्या कंपनीकडेच मिळत असतात. त्यामुळे त्याचे खराब झालेले पार्ट बदलायचे असल्यास तात्काळ हालचाल करावी लागते. विशेषतः सध्याच्या चक्रीवादळासारख्या परिस्थितीत युद्धपातळीवर दुरुस्ती करावी लागते, अशी कार्यवाही सुरूही झाली असेल, असेही होसाळीकर म्हणाले.
रडारमधून फक्त ३ तासांचा अंदाज मिळतो!
हवामानाचा अंदाज देणारे डॉप्लर रडार हे पुढच्या ८-९ तास किंवा २४ तासांचा हवामानाचा अंदाज देते, हा गैरसमज आहे. हे रडार केवळ पुढच्या ३-४ तासांचा हवामानाचा अंदाज देते. म्हणूनच पावसाळा किंवा वादळ अशा परिस्थतीतीत रडारची भूमिका महत्वाची ठरते. २४ तासांचा अंदाज देण्यासाठी काही गणिते असतात. उपग्रहाची मदत घेतली जाते. त्यानुसार हवामानाचा अंदाज बांधला जातो, असेही होसाळीकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community